"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:05 IST2025-05-06T16:03:29+5:302025-05-06T16:05:41+5:30
'कांडी'च्या मदतीने केदारनाथला पाठीवरून घेऊन जाणाऱ्या या लोकांना पिठ्ठू असं म्हणतात.

फोटो - आजतक
केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. केदारनाथला पोहोचण्यासाठी भाविकांना खूप अंतर चढून जावं लागतं. ही चढाई गौरीकुंडपासून सुरू होते आणि केदारनाथ येथे संपते. गौरीकुंडमध्येच काही लोक 'कांडी' (एक प्रकारची पालखी) मध्ये भाविकांना पाठीवर घेऊन जाताना दिसतात. 'कांडी'च्या मदतीने केदारनाथला पाठीवरून घेऊन जाणाऱ्या या लोकांना पिठ्ठू असं म्हणतात.
भाविकांना पाठीवर बसवून नेताना पिठ्ठूची अवस्था फार वाईट होते. भाविकांना वाहून नेणारी 'कांडी' बनवण्यासाठी ५ हजाराचा खर्च येतो. एका व्यक्तीला केदारनाथला घेऊन जाण्यासाठी १० तास लागतात. गौरीकुंडला परतण्यासाठी त्यांना सुमारे ८ तास लागतात. एका पिठ्ठूने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या चढाईदरम्यान अनेक वेळा नीट जेवणही त्यांच्या नशिबात नसतं. कधीकधी दयाळू प्रवासी त्यांच्यासोबत आणलेलं काही अन्न देतात.
काम जास्त आणि पैसे कमी
केदारनाथमध्ये भाविकांच्या वजनानुसार पिठ्ठू शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचं वजन ७० ते ८० किलो असेल तर त्याचं प्रवास भाडं १० ते १२ हजार रुपये असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीचं वजन कमी असेल तर त्याचं भाडं देखील कमी होतं. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचं वजन जास्त असेल तर त्याचं भाडं देखील जास्त होतं.
अनेक समस्यांना द्यावं लागतं तोंड
पिठ्ठूने सांगितलं की, हे काम अजिबात सोपं नाही. चढाई करताना इतकं वजन जास्त वेळ वाहून नेल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याच वेळा अनेक आठवडे पाय खूप सुजतात. शरीराला खूप त्रास होतो. संपूर्ण शरीरात वेदना होतात. तरीही आपल्या आरोग्याची काळजी न करता ते भाविकांचा भार वाहून नेत राहतात. बऱ्याचदा जेव्हा एखादा प्रवासी सोबत असतो आणि त्याची तब्येत बिघडते तेव्हा त्या प्रवाशाला दुसऱ्या कांडीमध्ये हलवलं जातं.