अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:50 IST2025-09-28T12:48:44+5:302025-09-28T12:50:13+5:30
Karur Stampede Update: दाक्षिणात्य अभिनेता विजय याच्या तामिळनाडू येथील करुर येथे झालेल्या सभेवेळी चेंगराचेंगरी होऊन सुमारे ३९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली आहे.

अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...
दाक्षिणात्य अभिनेता विजय याच्या तामिळनाडू येथील करुर येथे झालेल्या सभेवेळी चेंगराचेंगरी होऊन सुमारे ३९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय याचं सभेसाठी निर्धारित वेळेपेक्षा सहा तास उशिराने झालेलं आगमन आणि चाहत्यांची झालेली प्रचंड गर्दी हे या दुर्घटनेमागचं प्राथमिक कारण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती तामिळनाडूचे पोलीस महासंचालक जी. व्यंकटरामन यांनी सांगितले की, अभिनेता विजय याला सभेच्या ठिकाणी पोहोचण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे गर्दी वाढत गेली आणि ही दुर्घटना घडली. आता या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच विजय याच्या टीव्हीके पक्षाच्या दोन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक तपासासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे. टीव्हीकेने या सभेसाठी दुपारी १२ ते ३ पर्यंतची वेळ निश्चित केली होती. मात्र विजय संध्याकाळी सात वाजता सभेच्या ठिकाणी पोहोलचा, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आली आहे.
विजयच्या रॅलीवेळी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असलेले नंद कुमार यांनी सांगितले की, आम्ही स्वत: तिथे उपस्थित होतो. चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच गर्दीला नियंत्रित करण्यासाठी काहीही करता आलं नाही. आपण या ठिकाणी ११ वाजता पोहोचू असे विजय यांनी सांगितले होते. तशी कल्पना सर्वांना देण्यात आली. मात्र ते जेव्हा आले तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत. ते पूर्णपणे बरे होऊन सुखरूप घरी जावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो.
त्यांनी पुढे सांगितले की, चूक कोणाची आहे हे कळणे कठीण आहे. आपण वेळेत पोहोचू अशी अपेक्षा बाळगून लोक आले होते. काहीजणांनी आपल्या मुलांनाही आणलं होतं. यापैकी अनेक जण उपाशी होते. मात्र असं असलं तरी प्रत्येकजण आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी उत्सूक होता. तसेच त्याच उत्साहाने इथे आलेला होता.जे घडलं ते अत्यंत्य दु:खद आहे. अशा सभांचं आयोजन करताना खबरदारी घेऊन योजना आखली पाहिजे. मात्र योग्य सुरक्षा उपाययोजना केली असती तरी अपेक्षेपेक्षा १० ते १५ पटीने अधिक लोक आले तर कुणी काय करू शकतो.? ही एक गंभीर चूक होती. त्यामुळे अशा सभा घेताना काळजी घ्यावी. आता तामिळनाडू सरकारने पीडित लोकांना योग्य ती मदत प्रदान करावी, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, असेही त्यांनी सांगितले.