संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:36 PM2024-01-18T16:36:39+5:302024-01-18T16:37:39+5:30

२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले.

Karsevaks were shot to defend the Constitution; Samajwadi Party leader Shivpal Yadav's statement | संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

इटावा - समाजवादी पक्षाचे महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आणखी एक मोठे नेते शिवपाल यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार योग्य होता असं म्हटलं आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या. कोर्टाने अयोध्येत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे उल्लंघन कारसेवकांकडून झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती असं शिवपाल यादव यांनी सांगितले. 

शिवपाल यादव म्हणाले की, संविधानाचे रक्षण केले गेले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. भाजपाचे लोक खोटं बोलत आहेत. कोर्टाने स्थगिती दिलेली असतानाही वादग्रस्त ढाचा या लोकांनी तोडला. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सरकारची होती. त्याकाळी कुणी संविधान आणि कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले होते? कोर्टाच्याविरोधात जाणार त्यांच्यावर कारवाई होणारच असं सांगत त्यांनी २२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो. जितके देव आहेत सगळ्यांना मानतो असं त्यांनी सांगितले. 

याआधीही स्वामी प्रसाद मौर्य यांनीही एका विधानात कारसेवकांना समाजकंटक म्हटलं होते. ज्यावेळी अयोध्येत राम मंदिराची घटना घडली त्यावेळी तिथे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन करत समाजकंटकांनी तोडफोड केली. तत्कालीन सरकारने संविधान आणि कायद्याचे रक्षण केले. या सर्व गोंधळात गोळीबार करावा लागला होता. हे सरकारचे कर्तव्य होते आणि त्यांनी त्याचे पालन केले असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं. 

अयोध्येत १९९० मध्ये काय घडलं होते?
३३ वर्षापूर्वी १९९० मध्ये अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते. तेव्हा मुलायम सिंह यादव हे मुख्यमंत्री होते. अयोध्येला हिंदू साधू संत, कारसेवक मोठ्या प्रमाणात जमले होते. प्रशासनाने अयोध्येत कर्फ्यू लावला होता. त्यामुळे आलेल्या भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बाबरी मशिदीच्या १.५ किमी परिसरात बॅरिकेड्स लावले होते. मात्र या गर्दीवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. या गोंधळात पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात ५ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अयोध्येसह देशातील वातावरण तापलं होते. या गोळीबारानंतर हजारो कारसेवक हनुमान गढीला पोहचले होते. या घटनेच्या २ वर्षानंतर विवादीत ढाचा पाडण्यात आला होता. 

Web Title: Karsevaks were shot to defend the Constitution; Samajwadi Party leader Shivpal Yadav's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.