बेळगावात सरकारची दडपशाही; मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एकीकरण समितीच्या नेत्याचा पोलिसांकडून पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:35 IST2024-12-09T10:16:29+5:302024-12-09T11:35:07+5:30

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Karnataka Police chase Maharashtra Ekikaran Samiti leaders in Belgaon | बेळगावात सरकारची दडपशाही; मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एकीकरण समितीच्या नेत्याचा पोलिसांकडून पाठलाग

बेळगावात सरकारची दडपशाही; मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एकीकरण समितीच्या नेत्याचा पोलिसांकडून पाठलाग

Maharashtra Ekikaran Samiti :  महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. बेळगावात होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे, बेळगावमध्ये पोलिसांची दडपशाही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. एकीकरण समितीचे जेष्ठ नेते मालोजी अष्टेकरांचा पोलिसांकडून पाठलाग केला जात असल्याचे समोर आलं आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात आज महामेळाव्याचे आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या मागे कर्नाटक पोलीस लागले आहेत. अनेक नेत्यांच्या मागे पोलीस बाईकवरुन पाठलाग करत असल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे, पहाटेपासून धर्मवीर संभाजी महाराज चौकात पहाटेपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी कोणताही मोठा नेता पोहोचू नये यासाठी कर्नाटक पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे.

झी २४ तासच्या वृत्तानुसार, मॉर्निंग वॉकसाठी आणि व्यायामासाठी बाहेर निघालेल्या मालोजी अष्टेकरांचा कर्नाटक पोलिसांकडून पाठलाग करण्यात आला. कर्नाटक पोलीस दलातील साध्या वेशातील एक पोलीस कर्मचारी सातत्याने त्यांच्या मागावर होता. पोलीस कर्मचारी अष्टेकरांचा पाठलाग करत होता. अशा प्रकारे कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर दडपशाही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊ नयेत यासाठी सर्व कर्नाटक सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.  निपाणी पोलिसांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने कर्नाटक पोलीस सतर्क आहेत.

Web Title: Karnataka Police chase Maharashtra Ekikaran Samiti leaders in Belgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.