कर्नाटकमधीलकाँग्रेसच्या नेत्या आणि राज्य सरकारमधील मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला आज सकाळी मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात लक्ष्मी हेब्बालकर या बालंबाल बचावल्या. मात्र कारमधून प्रवास करत असलेले लक्ष्मी हेब्बाळकर यांचे भाऊ आणि आमदार चेन्नाराजू हे जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारांसाठी त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात आज पहाटे ५.३० च्या सुमारास कित्तूर येथे झाला. सोमवारी बंगळुरूमध्ये पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि संध्याकाळी विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर ह्या बेळगावमध्ये परतत होत्या. पहाटे ५.३० च्या सुमारास त्यांची कार कित्तूर येथे पोहोचली असताना अचानक एक कुत्रा त्यांच्या कारसमोर आला. त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने स्टियरिंग फिरवले. त्यामुळे कारचं नियंत्रण सुटून ती रस्त्याशेजारी असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. दरम्यान, कारमधील सेफ्टी एअरबॅग त्वरित उघडल्याने मोठा अपघात टळला.
या अपघातात लक्ष्मी हेब्बाळकर यांचा चेहरा आणि कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे. तर त्यांचे भाऊ आमदार चेन्नराजू यांच्या डोक्याला दुखापत झाली. या दोघांवरही एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.