Karnataka Hijab Controversy: कुणाला घाबरताय? जर बोलला नाही तर १० मार्चला परिणाम भोगा; हिजाब वादावर ओवैसी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:52 IST2022-02-09T12:51:55+5:302022-02-09T12:52:48+5:30
कुठलाही समाज अथवा व्यक्ती असो, जर तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तिला लढावं लागेल असं ओवैसींनी सांगितले.

Karnataka Hijab Controversy: कुणाला घाबरताय? जर बोलला नाही तर १० मार्चला परिणाम भोगा; हिजाब वादावर ओवैसी म्हणाले...
मुरादाबाद – कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. कर्नाटक सरकारनं पोटोस्वामी जजमेंट वाचायला हवं. तुम्ही कुणाला काय खायचं, काय घालायचं? हे सांगू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, एक मुलगी अनेक वर्षापासून हिजाब परिधान करते. अचानक तुम्हाला तिच्यावर बंदी आणण्याचा विचार कसा आला? अचानक नोटिफिकेशन जारी कसं केले? मोदी सरकारच्या एका डेटानुसार २१.९ टक्के मुस्लीम मुली ३ ते २५ वर्षातील आहे त्यांनी कधी शिक्षण घेतले नाही. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा केंद्र सरकारचा नारा आहे. एक मुलगी शाळेत शिक्षणासाठी जातेय तिला का रोखलं गेले? हिजाब आणि नकाब कुरानात लिहिलं आहे. मुस्कान नावाच्या मुलीनं धाडसानं प्रतिकार केला. ते कौतुकास्पद आहे. २० ते २५ युवक मुलांना कॉलेजमधून येण्यापासून रोखतात. या प्रकरणी मतांचं राजकारण का होतंय? असा सवाल त्यांनी केला.
त्याचसोबत कुठलाही समाज अथवा व्यक्ती असो, जर तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तिला लढावं लागेल. हिजाब मुद्द्यावर कुठल्याही राजकीय पक्षाने भाष्य न केल्यानं ओवैसींनी नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी बोलायला हवं, कुणाला घाबरताय? जर बोलला नाही तर १० मार्चला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे.
दरम्यान, फिफा आणि बास्केटबॉल फेडरेशननंही हिजाब घालून फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळण्याची परवानगी दिली. आपला देश कुठे चालला आहे. भाजपाच्या रॅलीत मुस्लीम महिला नकाब आणि हिजाब घालून जातात तर ते चांगले आहे. मग नकाब आणि हिजाब घालून स्कूल कॉलेजमध्ये जाण्यावर बंदी का? ओवैसींनी राहुल गांधी यांनाही प्रश्न विचारत ते कधी या मुद्द्यावर बोलणार का? असं त्यांनी विचारलं आहे.
कर्नाटकातील शिक्षणसंस्था तीन दिवस बंद
कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद चिघळला असून ही परिस्थिती पाहता, राज्यातील सर्व शिक्षणसंस्था ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिजाब बंदीवरून कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली. हिजाब बंदीचे प्रकरण न्यायलयात गेले असून, याप्रकरणी न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब केली होती.