“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 02:34 PM2023-04-30T14:34:13+5:302023-04-30T14:35:04+5:30

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला.

karnataka election 2023 pm modi replied congress mallikarjun kharge and said snake is the beauty of lord shiva neck | “सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

googlenewsNext

Karnataka Assembly Election 2023: १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसले असून, पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक राज्याचे मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचारसभांचा धुरळा उडवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला. आताच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये सापावरून एकमेकांवर टीका-प्रत्युत्तर रंगताना दिसत आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विषारी साप असल्याची टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आता प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल, अशी टीका करणारे आता माझी तुलना सापाशी करत जनतेकडून मते मागत आहेत. साप हे भगवान शंकराच्या गळ्याची शोभा आहे. माझ्यासाठी देशातील जनता हे देवाचे रूप आहे, शिवाचेच रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे. 

काँग्रेस आणि जेडीएस कर्नाटकातील विकासात मोठा अडथळा

एवढ्या मोठ्या संख्येने जनता सभांना उपस्थित राहत असल्याचे पाहून काँग्रेस आणि जेडीएसची झोप उडाली आहे. कर्नाटकाच्या विकासात काँग्रेस आणि जेडीएसचा मोठा अडथळा आहे. काँग्रेस आणि जेडीएस कितीही खेळ खेळू द्यात, पण कर्नाटकची जनता त्यांना क्लीन बोल्ड करून टाकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच कर्नाटकची ही निवडणूक केवळ आगामी पाच वर्षांसाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर ही निवडणूक येत्या २५ वर्षांच्या विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी आहे. एवढ्या मोठ्या व्हिजनवर अस्थिर सरकार कधीच काम करू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटकला भारतातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे, त्यामुळे येथे डबल इंजिनचे सरकार आवश्यक आहे. जोपर्यंत येथे काँग्रेस-जेडीएस युती राहिली, तोपर्यंत कर्नाटकच्या विकासाला ब्रेक लागला. जेव्हा येथे डबल इंजिनचे सरकार आले, तेव्हा येथील विकासाने नवी गती घेतली. काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांची कधीच पर्वा केली नाही, मात्र भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी बियाण्यापासून मार्केटपर्यंत काम करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: karnataka election 2023 pm modi replied congress mallikarjun kharge and said snake is the beauty of lord shiva neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.