हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध पक्षांचे नेते त्यांच्या भागातील लोकांचं दुःख कमी करण्यासाठी काम करत आहेत. याच दरम्यान, मंडी येथील भाजपा खासदार कंगना राणौतचं विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कुल्लूमध्ये पूरग्रस्तांसमोर कंगनाने स्वतःचच दुःख सांगितलं. तिच्या रेस्टॉरंटने काल ५० रुपयांच बिझनेस झाला असं म्हटलं .
"जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कसं काम करणार? आधी शांत व्हा. माझंही येथे घर आहे. मला काय सहन करावं लागत असेल ते समजून घ्या. माझंही येथे एक रेस्टॉरंट आहे, ज्याचा काल ५० रुपयांचा बिझनेस केला. माझा पगार फक्त १५ लाख रुपये आहे... कृपया माझंही दुःख समजून घ्या. मी देखील एक माणूस आहे."
"तुमच्यासारखीच मी देखील सिंगल वुमन आहे. माझ्यावर असा हल्ला करू नका" असं कंगनाने म्हटलं. तसेच तिने काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं आहे. "आधीही केंद्र सरकारकडून निधी येत होता. दुर्दैवाने, येथून निधी वळवला जात असल्याचा संशय आहे. काँग्रेस पक्ष येथून निधी वळवत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. हे चिंतेचे कारण आहे. कुठेही काम होत नाही" असं म्हणत कंगणाने निशाणा साधला.
मनालीमधील पतलीपूल येथे पोहोचल्यावर कंगना राणौतला लोकांच्या संतापाचा देखील सामना करावा लागला. लोकांनी गो बॅकचे नारे दिले. "कंगना राणौत, तू उशीर केलास, परत जा" अशा घोषणा लोकांनी दिल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना याचा फटका बसला आहे.