Kangana Ranaut Slams Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'व्होट चोरी'च्या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरले आहे. आज त्यांनी याच मुद्द्यावर एक सोशल मीडिया पोस्ट केली, ज्यात Gen-Z चा उल्लेख केला. आता या पोस्टवरुन भाजप खासदार कंगना राणौत यांनी टीका करताना म्हटले की, 'राहुल गांधींना जगात काय सुरुये, याची काही माहित नाही. ते नेहमीच देशाला लाज आणणारी विधाने करतात.'
मीडियाशी संवाद साधताना कंगना राणौत म्हणाल्या, 'राहुल गांधी देशातील Gen-Z ला निषेध करण्याचे आणि नेपाळ मॉडेल येथे लागू करण्याचे आवाहन करत आहेत. पण, त्यांना हे माहित असले पाहिजे की, Gen-Z ने नेपाळमध्ये घराणेशाहीचे सरकार पाडले. राहुल गांधींना जगात काय चालले आहे, याची काही माहिती नाही. ते सकाळी उठतात आणि डोळे चोळत काहीही पोस्ट करतात.'
'राहुल गांधींना हे माहित असले पाहिजे की, नेपाळमध्ये त्यांच्यासारख्याच घराण्यांचा पाडाव झाला आहे आणि लोकशाही स्थापित झाली आहे. त्यांनी असेच सुरू ठेवले, तर त्यांना या देशातून पळून जावे लागेल. त्यांनी यापूर्वी देश अस्थिर करण्याचा कट रचला आणि अमेरिकेला आपला देश वाचवण्याची विनंती केली होती. त्यांच्या कृतींमुळे देशाचा अपमान झाला आहे,' अशी टीका कंगनाने केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की, 'निवडणूक चौकीदार जागं राहून फक्त चोरी पाहत होता.' त्यांची ही टीका मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर होती. यापूर्वीही राहुल गांधींनी त्यांच्यावर लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला होता. आणखी एका पोस्टमध्ये राहुल गांधी लिहितात, 'देशातील तरुण, विद्यार्थी आणि देशातील नागरिक संविधानाचे रक्षण करतील, लोकशाहीचे रक्षण करतील आणि मतांची चोरी रोखतील. मी नेहमीच त्यांच्यासोबत उभा आहे. जय हिंद!'