कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:21 IST2025-12-15T23:20:23+5:302025-12-15T23:21:55+5:30
Kabaddi Player Rana Balachauria shot dead: बंबीहा टोळीने घेतली हत्येची जबाबदारी, गोळीबारानंतर हल्लेखोर पसार

कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
Kabaddi Player Rana Balachauria shot dead: पंजाबमधील मोहाली येथील सोहाना परिसरात सोमवारी रात्री एका खाजगी कबड्डी स्पर्धेदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. कबड्डीपटू आणि प्रमोटर राणा बालचौरिया याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मोहालीचे पोलिस अधीक्षक हरमनदीप हंस यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे गेले. राणा बालचौरिया थांबताच हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. ही घटना सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केली असल्याची चर्चा रंगली आहे. (Sidhu Moose Wala revenge)
बंबीहा टोळीचा हात असल्याचा संशय
राणा बालचौरियाला तातडीने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान मात्र त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याने जीव वाचण्याची शक्यता खूप कमी होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया अँक्टिव्हिटी तपासत आहेत. या हत्येमागे बंबीहा टोळीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे, पण पोलिसांनी याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
या घटनेचा प्रसिद्ध पंजाबी गायकाशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. कारण एक पंजाबी गायक गोळीबाराच्या काही काळापूर्वी कबड्डीस्थळी उपस्थित राहणार होता. यादरम्यान, बंबीहा टोळीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये सोहानामध्ये राणा बालाचौरियाच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. ही घटना सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केली असल्याची चर्चा रंगली आहे.
पंजाबी भाषेत लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की...
सर्वांना सत् श्री अकाल, राणा बालाचौरियाची आज मोहाली सोहाना साहिब कबड्डी कपमध्ये हत्या करण्यात आली. मी, डोनी बाल शगनप्रीत, मोहब्बत रंधावा, अमर खेवा प्रभदासवाल आणि कौशल चौधरी या हत्येची जबाबदारी स्वीकारतो. या माणसाने जग्गु खोती आणि लॉरेन्स बिश्नोईसोबत राहून आमच्याविरुद्ध काम केले. त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्याला आश्रय दिला आणि त्या माणसांची वैयक्तिक काळजी घेतली. आज, आम्ही राणाला मारून आमचा भाऊ मूसेवालाचा बदला घेतला. हे कृत्य आमच्या माखन अमृतसर आणि डिफॉल्टर करणने केले आहे. आजपासून, मी सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो की कोणीही जग्गू खोती आणि हॅरी टॉटच्या संघात खेळू नये नाहीतर त्यांनाही हेच परिणाम भोगावे लागतील. आम्हाला कबड्डीची कोणतीही ऍलर्जी नाही. आम्हाला खोती आणि हॅरी टॉटच्या कबड्डीमध्ये कोणताही हस्तक्षेप नको आहे.
लोकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, सुरुवातीला लोकांना वाटले की फटाके फोडले जात आहेत. हल्लेखोरांनी प्रेक्षकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. स्पर्धेच्या संध्याकाळच्या सामन्यांदरम्यान बक्षीस वितरण समारंभाला एक प्रसिद्ध पंजाबी गायक उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे स्टेडियममध्ये मोठी गर्दी जमली होती. पोलिस सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.