तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:04 IST2025-09-02T14:50:09+5:302025-09-02T15:04:55+5:30
के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आलं.

तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई
K. Kavitha Suspended: तेलंगणामधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या आणि आमदार के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आले. पक्षाची बदनामी करणाऱ्या कारवायांमुळे के. कविता यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी के. कविता यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणातील मुख्य विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबात खूप गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी कविता यांच्यावर मोठी कारवाई केली. पक्षाविरुद्धच्या वक्तव्यांमुळे आणि कारवायांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच के. कविता यांनी बीआरएस नेत्यांवर केसीआर यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला होता.
त्यानंतर आता के. कविता यांचे सध्याचे वर्तन आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत आहेत, त्यामुळे पक्षाध्यक्ष केसीआर यांनी कविताला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीआरएस यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ ऑगस्ट रोजीही कविता यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान बीआरएसने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यांना अचानक टीबीजीकेएस म्हणजेच तेलंगणा बोग्गु गनी कर्मिका संगमच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पदावरून काढून टाकणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल होते असं के. कविता यांनी म्हटलं होतं.
పార్టీ MLC శ్రీమతి కె. కవిత ఇటీవలి కాలంలో ప్రవర్తిస్తున్న తీరుతెన్నులు, కొనసాగిస్తున్న పార్టీ వ్యతిరేక కార్యకలాపాలు బీఆర్ఎస్ పార్టీకి నష్టం కలిగించే రీతిలో ఉన్నందున పార్టీ అధిష్టానం ఈ విషయాన్ని తీవ్రంగా పరిగణిస్తున్నది.
— BRS Party (@BRSparty) September 2, 2025
పార్టీ అధ్యక్షులు శ్రీ కె. చంద్రశేఖర్ రావు గారు శ్రీమతి కె.… pic.twitter.com/iTSWON3irq
दरम्यान, के कविता यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांच्यावर गंभीर आरोप केले. केटीआर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी करत होते, असा आरोप के कविता यांनी केला. केटीआर हे पक्षाचे संस्थापक के चंद्रशेखर राव यांचे सख्खे भाऊ आहेत. "माझ्या माहितीशिवाय पक्ष कार्यालयात निवडणुका घेण्यात आल्या, ज्यामुळे कामगार कायद्यांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. पक्षात काम कसे चालले आहे यावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यामुळे माझ्याविरुद्ध द्वेष होता," असेही के. कविता यांनी म्हटलं होतं.