पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर आखून दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. मात्र, या दरम्यान भारतातूनच अनेक गद्दार पोलिसांनी ताब्यात घेतले. हे लोक भारतात राहून पाकिस्तानला इथली संवेदनशील माहिती पुरवत असल्याचे धक्कादायक खुलासे देखील झाले. यातच हरियाणातील ३३ वर्षीय प्रसिद्ध ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला देखील अटक करण्यात आली. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. याच आरोपात तिला अटक करण्यात आली. दरम्यान आता तिच्या केरळ कनेक्शनबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे.
काही काळापूर्वी ज्योतीला केरळ सरकारने त्यांच्या पर्यटन प्रमोशनसाठी अधिकृतपणे आमंत्रित केले होते. अलिकडेच एका माहिती अधिकार अहवालात हा खळबळजनक खुलासा झाला आहे. इतकंच नाही तर, ज्योतीच्या केरळ सहलीचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने उचलला होता. माहिती अधिकार अहवालानुसार, केरळ पर्यटन विभागाच्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ज्योती मल्होत्राने केरळ राज्याला भेट दिली होती.
केरळ सरकारनेच बोलावलं!
केरळ टुरिझमचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्योतीला तिथे सरकारच्यावतीने बोलावण्यात आले होते. सध्याच्या डिजिटल युगात केरळला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून सादर करणे हा यामागचा हेतु होता. यासाठी सोशल मीडिया स्टार्सचा वापर केला गेला. यावेळी ज्योतीला देखील बोलावण्यात आले होते. ज्योतीचा प्रवासाचा, राहण्याचा आणि फिरण्याचा सगळा खर्च सरकारी तिजोरीमधून झाला होता.
ज्योतीने २०२४ ते २०२५ दरम्यान केरळमधील कन्नूर, कोझिकोड, कोची, अलाप्पुझा आणि मुन्नार सारख्या सुंदर ठिकाणांना भेट दिली. केरळ सरकारच्या इन्फ्लुएंसर प्रोग्राम अंतर्गत ज्योतीसह इतर अनेक डिजिटल क्रिएटर देखील यात सहभागी झाले होते. यावेळी ज्योतीने तिच्या व्लॉगिंगद्वारे केरळचे सौंदर्य जगासमोर सादर केले. ज्योतीचे स्वतःचे एक युट्यूब चॅनेल आहे.
ज्योती आणि भारतविरोधी एजंट्सचा प्रसारभारतीय सुरक्षा यंत्रणांनी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कवर कारवाई करत १२ जणांना अटक केली, यात ज्योतीचा समावेश आहे. या नेटवर्कवर भारतीय सोशल मीडिया क्रिएटर्सना लक्ष्य करून, गुप्त माहिती गोळा करण्याचा आरोप आहे. ज्योतीच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या यूट्यूब चॅनलचीही सध्या चौकशी सुरू आहे. गेल्या काही महिन्यात, ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली होती.