केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:19 IST2025-07-26T06:19:24+5:302025-07-26T06:19:39+5:30
एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही .

केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
रायपूर : एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही असा निकाल छत्तीसगडउच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. संजय अग्रवाल यांनी पुरेशा पुराव्याच्या अभावामुळे या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली. १४ ऑक्टोबर २०१९ रोजी पंधरा वर्षे वयाची विद्यार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना एका तरुणाने तिला रस्त्यात गाठले व ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेमाची कबुली दिली.
शिक्षकांनी दिली होती समज
हा युवक आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार त्या विद्यार्थिनीने याआधीही केली होती व शिक्षकांनी त्याला समज दिली होती. मात्र त्या तरुणाने पुन्हा गैरकृत्य केल्याने तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
प्रकरणातील साक्षींवरून नेमके काय सिद्ध झाले?
उच्च न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे पाहून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयच कायम ठेवला. उच्च न्यायालयाने सांगितले की, आय लव्ह यू हे वाक्य लैंगिक द्योतक ठरत नाही. आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत संवाद साधला नाही, अश्लील चाळे, हातवारे केले नाहीत. हे या प्रकरणातील साक्षींवरूनही सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीने या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला या आरोपात काहीही तथ्य नाही. विद्यार्थिनीची जात काय आहे याबद्दल या तरुणाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे एससी / एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदाही या प्रकरणात लागू होत नाही.
लैंगिक हेतू असल्यासच पोक्सोंतर्गत कारवाई
यालयाने याप्रकरणी निकाल देताना २०२१मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला. त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपीने लैंगिक हेतूने काही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर पोक्सो कायद्यातील लैंगिक छळविषयक कलम लागू होईल. केवळ संवाद, एखादे वाक्य यांच्यावरून आरोपीने एखाद्याचा लैंगिक छळ केला असे सिद्ध होत नाही. तसा आरोप करणेही चुकीचे आहे असे छत्तीसगड न्यायालयाने म्हटले आहे.