केदारनाथची वाट होणार सुकर; ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत, नेमका काय आहे प्लान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:32 IST2025-03-06T08:31:31+5:302025-03-06T08:32:52+5:30
दिवसाला ११,००० भाविकांना मिळेल सेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी

केदारनाथची वाट होणार सुकर; ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत, नेमका काय आहे प्लान?
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथचं दर्शन घेण्याची इच्छा अनेकजण तेथील खडतर प्रवासामुळे पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, आता हे दर्शन सोपे होणार असून, नऊ तासांचे अंतर ३६ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक समितीने गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान १२.४ किमी लांबीचा रोपवे प्रकल्प विकसित करायला मंजुरी दिली. २,७३०.१३ कोटी रुपये खर्च येणार असून, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट ते बांधणार असल्याजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
हेमकुंड साहिब जी पर्यंत पोहोचण्यासाठी, सध्या गोविंदघाटपासून २१ किलोमीटरची चढाई पायी, खेचरावर अथवा पालखीने पार केली जाते. हा प्रवास आव्हानात्मक आहे. केदारनाथमध्ये भगवान शंकराचे मंदिर आहे. हे समुद्रसपाटीपासून ३,५८४ मीटर उंचीवर आहे. येथे मंदाकिनी नदी आहे. केदारनाथ धाम हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
दिवसाला ११,००० भाविकांना मिळेल सेवा
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारीमधून ही योजना पूर्ण केली जाणार आहे. केदारनाथमध्ये बांधला जाणारा हा रोपवे सर्वांत प्रगत ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामध्ये जो प्रति तास १,१०० प्रवासी आणि दिवसाला ११,००० भाविक वाहतूक करण्याच्या दृष्टीने डिझाईन केला जाईल. हा रोप-वे प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर माध्यमातून विकसित केला जाईल. हेमकुंड साहिब हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १५ हजार फूट आहे.