हृदयस्पर्शी! रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालक भावाची बहिणींना खास भेट, मोफत सोडतो घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:01 IST2023-08-30T16:00:50+5:302023-08-30T16:01:47+5:30
प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊ शेकडो बहिणींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या भावांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत प्रवास करून देतो.

फोटो - news18 hindi
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आणि भावाच्या प्रेमाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण जोधपूरचा एक भाऊ प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला अनोखी श्रद्धांजली देत आहे. त्याच्या बहिणीचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं. त्याच्या स्मरणार्थ, प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊ शेकडो बहिणींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या भावांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत प्रवास करून देतो.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या मदेरणा कॉलनीत राहणारा धनराज दाधीच प्रत्येक बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत त्यांच्या भावांकडे घेऊन जाण्याची मोफत सेवा देत आहेत. धनराज दाधी हा उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो. पण रक्षाबंधनाच्या दिवशी फोन करणाऱ्या प्रत्येक बहिणीला तिच्या भावाच्या घरी मोफत घेऊन जातो.
धनराज दाधीच रक्षाबंधनाच्या आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सएपवर रक्षाबंधनानिमित्त मोफत प्रवासाचा संदेश देतो. त्याने आपल्या ऑटोवर मोफत प्रवासाचे पोस्टरही चिकटवले आहे. तसेच फेसबुकवर रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या बहिणींना मोफत प्रवासाचा संदेश दिला आहे. पोस्टरमध्ये त्याने आपला मोबाईल नंबरही दिला आहे.
५ वर्षांपूर्वी धनराज दाधीच याची एकुलती एक बहीण बेबी हिचं निधन झालं होतं. त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक रक्षाबंधनाला प्रत्येक बहिणीला त्याच्या ऑटोमध्ये मोफत प्रवास करण्याची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत ५ वर्षांनंतर धनराज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना भावांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी मोफत प्रवास करून देतो. तो म्हणतो की त्याची बहीण या जगात नाही. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही त्याची बहीण असते आणि त्यांना मोफत प्रवास देऊन खूप आनंद होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.