Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. यानंतर आता भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे. जगभरातील अनेक देश भारताच्या या कारवाईचे समर्थन करत आहे. अशातच तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेल्या खुल्या पाठिंब्यामुळे याविरोधात काही पावले उचलली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेत, तुर्कस्तानातील विद्यापीठाशी केलेला करार रद्द केला आहे.
पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. यातच पाकिस्तानकडून जे ड्रोन हल्ले झाले, त्यातील काही ड्रोन हे तुर्कीने पुरवल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही, तर तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे आता भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय पर्यटकांनी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानला त्यांनी दणका दिला आहे. अझरबैयजान आणि तुर्कीयेतील बुकिंग ६० टक्के कमी झाले आहे. तर व्यापारी आघाडीवरही तुर्कस्तानला धक्के दिले जात आहेत. यातच जवाहरलाल नेहरू विद्यापठीने तुर्की विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार रद्द केल्याचे म्हटले आहे. जेएनयूने एक्सवरून याबाबतची माहिती दिली.
तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ तुर्की यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. जेएनयू राष्ट्रासोबत आहे, असे एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला होता. या करारांतर्गत प्राध्यापकांच्या देवाणघेवाणी आणि विद्यार्थी देवाणघेवाणी कार्यक्रमांसह इतर योजना यामध्ये होत्या, असेही समजते.
दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्कीविरुद्ध लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने जेएनयूने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.