"जिल्हाधिकाऱ्याच्या मदतीने निवडणूक जिंकली"; केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान, व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:53 IST2025-12-20T18:50:12+5:302025-12-20T18:53:24+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने निवडणूक जिंकल्याच्या आरोपावर जीतनराम मांझी यांनी स्पष्टीकरण दिलं.

"जिल्हाधिकाऱ्याच्या मदतीने निवडणूक जिंकली"; केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान, व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
Jitan Ram Manjhi: केंद्रीय मंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे सर्वेसर्वा जीतनराम मांझी सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने निकालात फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाने केल्यानंतर, मांझी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
नेमका वाद काय?
नुकताच गया जिल्ह्यातील एका सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरजेडीने हा व्हिडिओ शेअर करत असा दावा केला की, "मांझी यांनी खुल्या मंचावरून मान्य केले आहे की, २०२० च्या निवडणुकीत टिकारी मतदारसंघात त्यांचा उमेदवार २७०० मतांनी हरत होता, परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांच्या मदतीने त्यांनी निकाल फिरवला आणि विजय मिळवला." आरजेडीच्या मते, मांझी यांनी , २०२५ च्या निवडणुकीत अशी मदत न मिळाल्याने त्यांच्या पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याचे म्हटले.
जीतनराम मांझींचे स्पष्टीकरण
व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी म्हणाले, "माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. २०२० च्या निवडणुकीत आमचा उमेदवार सुरुवातीला २७०० मतांनी मागे होता. त्यानंतर आम्ही रिकाउंटिंगची मागणी केली आणि त्यात आमचा विजय झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये मी केवळ रिकाउंटिंगच्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल बोलत होतो."
मांझी पुढे म्हणाले की, "२०२५ च्या निवडणुकीतही काही जागांवर रिकाउंटिंग झाले, ज्यात काही उमेदवार २७ मतांनी जिंकले तर काही हरले. रिकाउंटिंग मागणे हा उमेदवाराचा अधिकार आहे. आमचा उमेदवार मतमोजणी सोडून का पळाला? हे मी त्याला विचारत होतो."
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
आरजेडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मांझी यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. एका आयएएस अधिकाऱ्याचा वापर करून लोकशाहीची थट्टा उडवल्याचे आरजेडीने म्हटले आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनीही यात उडी घेतली आहे. "जर व्हिडिओशी छेडछाड झाली असेल, तर मांझी यांनी मूळ व्हिडिओ सार्वजनिक करावा, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल," असे आव्हान त्यांनी दिले आहे.
मांझी यांनी हा व्हिडिओ एडिटेड असल्याचे सांगत विरोधकांवर दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.या प्रकरणाने बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला केंद्रीय मंत्री रिकाउंटिंगचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.