लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशाच्या फाळणीच्या आठवणी जागवण्यासाठी तयार केलेल्या विशेष मॉड्युलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) मोहम्मद अली जिना, तत्कालीन काँग्रेस नेतृत्व आणि व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना फाळणीसाठी जबाबदार धरले आहे.
भारतात आहोत की पाकिस्तानात ?:
माउंटबॅटन यांनी फाळणीची तारीख जून १९४८ ऐवजी ऑगस्ट १९४७ मध्ये आणली, यामुळे पुरेसा वेळ मिळाला नाही. सीमा ठरवण्याचे काम घाईघाईने झाले. पंजाबमध्ये १५ ऑगस्टनंतरही लाखो लोकांना आपण भारतात आहोत की पाकिस्तानात हे माहीत नव्हते.एनसीईआरटीच्या मते, 'चुकीच्या विचारां'मुळे भारताची फाळणी झाली.
१९४० मध्ये मुस्लीम लीगच्या परिषदेत जिना यांनी हिंदू आणि मुस्लीम हे दोन भिन्न विचारसरणीचे आहेत, असे म्हटले होते. या मॉड्युलमध्ये 'फाळणीचे गुन्हेगार' या शीर्षकाखाली म्हटले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी झाली. मात्र, हे एका व्यक्तीचे काम नव्हते, तर तीन घटक यासाठी जबाबदार होते : फाळणीची मागणी करणारे जिना. फाळणी स्वीकारणारी काँग्रेस. फाळणीची अंमलबजावणी करणारे माउंटबॅटन.
फाळणी म्हणजे कडू औषध
- मॉड्यूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एका विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात त्यांनी फाळणीला 'कडू औषध म्हटले होते, तर नेहरूंनी देशाची फाळणी 'वाईट पण अपरिहार्य' असल्याचे म्हटले होते.
- फाळणीला महात्मा गांधींचा 3 विरोध होता, पण त्यांनी काँग्रेसच्या निर्णयाविरुद्ध हिंसक मार्गाने जाण्यास नकार दिला, असेही यात नमूद आहे. एनसीईआरटीचे हे मॉड्यूल नियमित अभ्यासक्रमाचा भाग नाही.