चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना मिळाला जामीन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 16:03 IST2019-07-12T16:03:25+5:302019-07-12T16:03:49+5:30
बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना मिळाला जामीन, पण...
रांची - चारा घोटाळ्या प्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यामुळे बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अन्य दोन प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांनी सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.
देवघर कोषागार प्रकऱणात शिक्षेचा अर्ध्याहून अधिक अवधी पूर्ण झाल्याचा आधार घेऊन लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजुर केला. मात्र लालूप्रसाद यादव यांनी आपला पारपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
Jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in the fodder scam case relating to Deoghar treasury. (File pic) pic.twitter.com/wWYloD6bew
— ANI (@ANI) July 12, 2019
चारा घोटाळ्या प्रकरणी याआधी 5 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी रांची उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दिलासा दिला नव्हता. तसेच लालूप्रसाद यादव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी हायकोर्टाने 12 जुलै ही तारीख निश्चित केली होती. सध्या लालू प्रसाद यादव हे रांचीमधील कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
यावर्षी 29 मे रोजी रांचीमधील विशेष न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणी 16 आरोपींना दोषी ठरवले होते. तसेच त्यांना तीन-ते चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. एस. एन. मिश्रा यांच्या विशेष न्यायालयाने चाईबासा येथील कोषागारातून घोटाळा करून 37 कोटी रुपये काढल्याप्रकरणी 16 जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी 11 जणांना तीन वर्षे तर अन्य पाच जणांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.