जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:25 AM2019-03-04T06:25:28+5:302019-03-04T06:25:57+5:30

भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे.

Jaysh-e-Mohammed's head Masood Mela ?, Pakistan's media claim | जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

Next

नवी दिल्ली : भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. पाकिस्तान सरकारने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, तसेच जैश-ए-मोहम्मदनेही याबाबत कोणतीही माहिती प्रसारित केलेली नाही. मात्र, त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुलवामा येथे केलेल्या भीषण हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांत गंभीर जखमी झालेला मसूद अझहर
मरण पावला असल्याचा दावा पाक माध्यमांनी केला.
मसूदची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून, त्याला दररोज डायलिसिस करून घ्यावे लागते, अशीही चर्चा समाजमाध्यमांत सुरू आहे. बालाकोटमधील हल्ल्यातच मसूद अजहर मारला गेल्याचा दावा टिष्ट्वटरवर अनेकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव प्रचंड वाढल्याने त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मसूद अजहरबाबत पाकिस्तानकडून उलटसुलट बातम्या पेरल्या जात आहेत, असे मतही काही जणांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले आहे.
त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. किडनीच्या आजारावर उपचार सुरू असताना मसूदचा मृत्यू झाला का? त्याच्यावर कुठे उपचार सुरू होते? बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जखमी होऊन उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला का? मसूदच्या मृत्यूची बातमी पसरवून पाक त्याला लपवू पाहात आहे का? जागतिक पातळीवर इम्रान खान स्वत:ला वाचवू पाहात आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळू शकतील.
मसूद हा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक असून, ही संघटना मुख्यत्वे पाकव्याप्त काश्मीरमधून घातपाती कारवाया घडवत असते. पुलवामातील हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. त्यानंतर, मसूदवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. पुलवामा हल्ल्यामागे जैश असल्याचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला सुपुर्द केले आहेत. १९९९ साली हरकत-उल-मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे काठमांडूहून अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदाहारला नेले होते. भारतात कैदेत असलेल्या मसूद अजहर व अन्य दोन दहशतवाद्यांची वाजपेयी सरकारने मुक्तता केल्यास विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात येईल, अशी अट अपहरणकर्त्यांनी घातली होती. त्यानुसार, मसूदला मुक्त करण्यात आल्यानंतर तो पाकिस्तानात गेला होता. आयएसआयच्या मदतीने त्याने पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून भारतात घातपाती कारवाया सुरू केल्या.
>पाकिस्तान मसूदला दहशतवादी ठरवणार?
मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध न करण्याची भूमिका पाक सरकार घेणार असल्याचे कळते. परंतु, तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत झाल्यानंतर पाक काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. तो खरेच जिवंत असल्यास त्याला नजरकैदेत ठेवणार की अटक करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
>नेमके काय झाले?
किडनीच्या आजारावर उपचार सुरू असताना मसूदचा मृत्यू झाला का? कुठे उपचार सुरू होते?
बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जखमी होऊन उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला का?
मसूदच्या मृत्यूची बातमी पसरवून पाक त्याला लपवू पाहात आहे का?

Web Title: Jaysh-e-Mohammed's head Masood Mela ?, Pakistan's media claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.