जयललिता ३ जूनला पंतप्रधानांना भेटणार
By Admin | Updated: May 31, 2014 06:24 IST2014-05-31T06:24:20+5:302014-05-31T06:24:20+5:30
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता येत्या ३ जून रोजी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेणार आहेत

जयललिता ३ जूनला पंतप्रधानांना भेटणार
चेन्नई : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता येत्या ३ जून रोजी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेणार आहेत. केंद्राकडून राज्याला अधिकाधिक मदत मिळवून घेणे हा त्यांच्या या बैठकीमागील मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेचे राष्टÑाध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांच्या उपस्थितीला विरोध करीत जयललिता यांनी २६ मे रोजी मोदी यांच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला होता. राजपाक्षे यांना आमंत्रित करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जयललिता नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकस्थित कार्यालयात मोदी यांची भेट घेतील आणि त्यांना एक निवेदनही सादर करतील. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या तामिळनाडूशी संबंधित काही मुद्यांचा यात समावेश असेल. (वृत्तसंस्था) राज्यहिताच्या रक्षणार्थ आणि विकासाला वेग देण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक अशा काही मुद्यांकडेही यावेळी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात येईल. जयललिता यांनी २०११ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती आणि राज्याशी संबंधित अनेक मागण्यांचे निवेदन त्यांना दिले होते. जयललिता यांनी मोदी यांच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला असला तरी उभयतांचे संबंध चांगले असल्याचे मानले जाते. जयिललिता यांच्या मुख्यमंत्रिपदी शपथविधीला ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे जयललितासुद्धा २०१२ साली गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदी शपथविधीला हजर होत्या.