जम्मू-काश्मीर: 'तो' फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:55 IST2018-10-01T18:33:39+5:302018-10-01T18:55:28+5:30
आदिल बशीरचा हिज्बुल मुजाहिद्दीन कमांडरसोबतचा फोटो वायरल

जम्मू-काश्मीर: 'तो' फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सामील
श्रीनगर : आठ हत्यारं घेऊन पलायन केलेल्या जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेला आदिल बशीर गेल्या आठवड्यात आठ शस्त्रास्त्रांसह फरार झाला होता. तो शोपिया जिल्ह्याचा रहिवासी आहे.
हिज्बुलचा कमांडर जीनत-उल-इस्लामसोबत एके-47 रायफल हातात धरलेल्या आदिल बशीरचा फोटो आज सोशल मीडियावर वायरल झाला. बशीर गेल्या आठवड्यात आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात होता. तिथून तो सात रायफल आणि एक पिस्तुल घेऊन फरार झाला. एका व्यक्तीनं आदिल बशीरला पळून जाण्यात मदत केली होती. त्याची ओळख पटल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आदिल बशीर वाछी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे पीडीपीचे आमदार एजाज अहमद यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी तैनात होता.त्याचं वय 24 वर्षे असून तो शोपिया जिल्ह्याच्या जैनपोरा भागाचा रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल केला आहे. आदिल बशीर सात एके-27 रायफल आणि एका पिस्तुलासह फरार झाल्यावर आमदार एजाज अहमद यांच्या सुरक्षेत असलेल्या 10 खासगी सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली.