पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूच्या अरनियामध्ये रात्रभर उखळी तोफांनी हल्ला, आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:36 IST2018-05-22T08:27:25+5:302018-05-22T09:36:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार पाकिस्तान काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूच्या अरनियामध्ये रात्रभर उखळी तोफांनी हल्ला, आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
जम्मू-काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार पाकिस्तान काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये. सोमवारी रात्रीही पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरमधल्या अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा एकदा गोळीबार केला. पाकिस्ताननं अरनिया सेक्टरमध्ये रात्रभर उफळी तोफांचा मारासुद्धा केला. या गोळीबारात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता. अरनियातील त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार बंद केला होता. पण त्यानंतर काही तासांतच पाकने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणा-या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला. सध्या पाककडून उखळी तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळे त्याच भाषेत भारतीय जवानही त्यांना उत्तर देत आहेत. त्यात पाकिस्तानचे 4 ते 6 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
An 8 month old infant was killed after being hit by a bullet reportedly during ceasefire violation by Pakistan in Keri Battal area of Akhnoor near LOC. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) May 22, 2018
शाळा बंद, लोक घराच्या आत
पाकने आपला नापाक चेहरा दाखवत असून, गोळीबार व तोफांचा मारा थांबवायला तयार नाही. त्यामुळे बीएसएफ व स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय त्या परिसरातील शाळादेखील बंद ठेवल्या आहेत.
पोलीस चौकीवर हल्ला
पाकिस्तानच्या कागाळ्या सुरू असतानाच काश्मीर खोºयातील पुलवामा जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काही अतिरेक्यांनी सोमवारी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना लगेच गोळीबाराने उत्तर दिले. अतिरेकी पळून गेले असून, त्यांचा शोध जारी आहे. या हल्ल्यात कसलेही नुकसान झालेले नाही.