जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पडली कडाक्याची थंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 23:51 IST2019-12-01T23:51:49+5:302019-12-01T23:51:58+5:30
जम्मूमध्ये वैष्णवदेवी देवस्थानाच्या पायथ्याशी कटरा येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान आहे.

जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पडली कडाक्याची थंडी
जम्मू : जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. लडाखमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर तापमान उणे १३.२ अंश सेल्सिअस झाले होते. यंदाच्या हिवाळ्यात लडाखमध्ये रात्रीच्या वेळेस पहिल्यांदाच तापमान इतके खाली घसरले.
काश्मीरमधील श्रीनगर व अन्य भागांमध्येही पारा शून्याच्या खाली गेला होता. जम्मूमध्ये ८.२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. येथील गुलमर्ग या पर्यटनस्थळी गेल्या आठवड्यात झालेल्या हिमवर्षावामुळे रस्त्यावर बर्फाचा काही फुटांचा थर साचला आहे. गुलमर्गमध्ये उणे ८ अंश सेल्सिअस तापमान, पहलगाम येथे उणे ६.६ अंश सेल्सिअस, कुपवारा येथे उणे ३.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. श्रीनगरचे कमाल तापमान उणे ०.९ अंश सेल्सिअस आहे. जम्मूमध्ये वैष्णवदेवी देवस्थानाच्या पायथ्याशी कटरा येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमान आहे.
झोजिला खिंड परिसरात बर्फवृष्टी
झोजिला खिंड व परिसरात प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याआधी पीर की गली भागात जोरदार हिमवर्षावामुळे मुघल रोडवरील वाहतूक ६ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आली होती.