Kishtwar Encounter: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आदिल असून, तो पाकिस्तानचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. आदिल हा जैशचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सैफुल्ला उर्फ स्वारुद्दीन याचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता.
जैशच्या 'टॉप कमांडर'चा असा झाला अंत
सुरक्षा दलांना किश्तवाडच्या डिछार आणि चत्रू परिसरात २ ते ३ दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआयएफ डेल्टा, व्हाइट नाईट कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. बुधवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या धुमश्चक्रीत आदिल मारला गेला. आदिलवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्ये सामील होता.
ऑपरेशन त्राशी-१
लष्कराने या मोहिमेला ऑपरेशन त्राशी-१ असे नाव दिले असून, अद्यापही घनदाट जंगलात आणि दुर्गम भागात इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. किश्तवाडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून चत्रूच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कडेकोट नाकेबंदी करण्यात आली आहे.
उधमपुरमध्येही २ दहशतवाद्यांचा खात्मा
किश्तवाडमधील चकमकीच्या काही तास आधी, उधमपुरमधील बसंतगड भागात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह अन्य एका दहशतवाद्याला मारले होते. पीर पंजाल डोंगररांगांच्या दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांना खदेडण्यासाठी भारतीय लष्कराने मोठी मोहीम हाती घेतली आहे.
पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीचा कट उधळला
जम्मू सेक्टरमधील एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दहशतवाद्यांना शस्त्रे आणि अमली पदार्थ पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र भारतीय लष्कराने हा कट उधळून लावण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे.
शहीद जवानाचा सूड
गेल्या १८ जानेवारीला सोन नार परिसरात जैशच्या दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. आदिलच्या खात्म्यामुळे सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा बदला घेतल्याचे मानले जात आहे.
Web Summary : Security forces killed Pakistani Jaish-e-Mohammad commander Adil in Kishtwar's Trashi operation. Adil, carrying a ₹5 lakh bounty, was involved in attacks on Indian forces. The operation continues in the dense forests. Earlier, two terrorists were killed in Udhampur. Army foils Pakistani drone infiltration attempts.
Web Summary : किश्तवाड़ में सुरक्षा बलों ने ऑपरेशन त्रशी में पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मद कमांडर आदिल को मार गिराया। आदिल पर 5 लाख रुपये का इनाम था और वह भारतीय बलों पर हमलों में शामिल था। घना जंगल में अभियान जारी है। इससे पहले उधमपुर में दो आतंकवादी मारे गए। सेना ने पाकिस्तानी ड्रोन घुसपैठ के प्रयास को विफल किया।