जयपूर टँकर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २२ वर्षीय विनीता हिचाही समावेश आहे. जेव्हा विनीताने जयपूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्याऐवजी उदयपूरहून बस पकडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला पुढे असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. वृत्तसंस्थेनुसार, २५ डिसेंबर रोजी रुग्णालयात गंभीर भाजल्यामुळे मृत्यू झालेल्या तीन लोकांपैकी विनीता एक होती. २० डिसेंबर रोजी जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि एलपीजी टँकर यांच्यात झालेल्या धडकेनंतर लागलेल्या आगीत तिचा मृत्यू झाला.
विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती आणि जयपूरमध्ये बस थांबण्याची वाट पाहत होती, परंतु स्टॉपच्या काही मीटर अगोदरच, तीव्र ज्वाळांनी तिला वेढलं आणि ती गंभीररित्या भाजली. पाच दिवस एसएमएस हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या या घटनेत आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे, तर १५ जणांवर उपचार सुरू आहेत.
विनीता उदयपूरला परीक्षेला बसण्यासाठी गेली होती आणि तिला शुक्रवारी सकाळी ट्रेन पकडायची होती, पण लवकर पोहोचेल असं वाटल्याने तिने गुरुवारी रात्री स्लीपर बसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. विनीताचे वडील रामचंद्र म्हणाले, मला तिच्याकडून फोन येण्याची अपेक्षा होती की, ती जयपूरला पोहोचली आहे. मला फोन आला, पण तो फोन अपघाताबद्दल होता. घटनेच्या वेळी विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती. बस टँकरच्याच मागे होती.
वडील म्हणाले की, आग लागली तेव्हा तिने मला लगेच फोन केला. हे ऐकून मला धक्काच बसला. कॉल डिस्कनेक्ट झाला आणि काही वेळाने आम्हाला कळलं की ती गंभीर जखमी आहे. आग लागल्यानंतर विनीताने बसमधून उडी मारून काही अंतरापर्यंत धाव घेतली, मात्र तोपर्यंत ती गंभीररीत्या भाजल्याचं सांगितलं. ७० टक्के भाजल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
प्रतापगडचे रहिवासी रामचंद्र यांनी सांगितलं की, विनीता जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि तिथे तिच्या लहान बहिणीसोबत राहत होती. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन प्रतापगडला रवाना झाले. एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक सुशील भाटी यांनी सांगितलं की, बुधवारी तिघांचा मृत्यू झाला. ते म्हणाले, आणखी तीन मृत्यूंसह आतापर्यंत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.