भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:50 IST2025-04-10T11:50:07+5:302025-04-10T11:50:17+5:30
नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जैन धर्माने भारताची ओळख निर्माण करण्यासाठी अमूल्य भूमिका पार पाडली आहे. या धर्माची शिकवण व मूल्यामुळे दहशतवाद, युद्ध व पर्यावरण संरक्षण यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोलाची मदत झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या प्राचीन धर्माचा वारसा आणि शिकवणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले, तीर्थंकरांची शिकवण व मूर्तींच्या माध्यमातून या धर्माचा प्रभाव संसद भवनातही दिसून येतो. जैन धर्मातील अनेकांतवाद या सिद्धांतात वेगवेगळ्या दृष्टिकोनाची प्रशंसा केलेली आहे. अनेकांतवाद जैन धर्मात निरपेक्षतेला प्रोत्साहन देणारा एक प्रमुख सिद्धांत असल्याने अंतिम सत्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. हा धर्म शांतता, सौहार्द व पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. हवामान बदल आजचे सर्वांत मोठे संकट असून, स्थायी जीवनशैली हे त्यावरील समाधान आहे. हा समुदाय स्थायी जीवनशैलीचे पालन करत असल्याचे सांगत मोदींनी जैन धर्माची प्रशंसा केली. ‘जितो’चे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, ‘जितो’चे प्रेसिडेन्ट विजय भंडारी आणि गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांचा नामोल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी ‘जितो’चे प्रतिनिधी विज्ञान भवनात उपस्थित होते.
जैन साहित्य हे भारताच्या आध्यात्मिक वैभवाचा कणा
जैन धर्माचे साहित्य भारताच्या आध्यात्मिक वैभवाचा कणा आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
प्राचीन जैन ग्रथांचे डिजिटायझेशन, पाली व प्राकृत भाषेला शास्त्रीय भाषा घोषित करणे, यासारख्या योजना सुरू केल्या आहेत.