...तर हा पूर्वनियोजित खून ठरेल : भारत
By Admin | Updated: April 11, 2017 04:41 IST2017-04-11T04:41:45+5:302017-04-11T04:41:45+5:30
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान

...तर हा पूर्वनियोजित खून ठरेल : भारत
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानले जाईल, अशा तिखट शब्दांत भारताने आपली भूमिका पाकिस्तानला कळविली.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेचा खलिता त्यांच्याकडे सापविला. बासित यांनी तो पाकिस्तान सरकारकडे पोहोचविणे अपेक्षित आहे.कायदा आणि न्यायाच्या मुलभूत तत्त्वांचे पालन न करता खटला चालवून दिलेल्या या शिक्षेनुसार जाधव यांना फाशी दिली गेली तर भारत सरकार आणि भारतीय जनता पाकिस्तानने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानेल, असेही बासित यांना स्पष्टपणे बजावण्यात आले.
खटल्यात जाधव यांना बचावाची पूर्ण संधी देण्यात आली व बचावासाठी वकिलही देण्यात आला हा पाकिस्तानचा दावा धादान्त फसवा असल्याचे नमूद करता बासित यांना असेही सांगण्यात आले की, जाधव यांना राजनैतिक प्रतिनिधीमार्फत मदत देण्याची भारताने १३ वेळा केलेली विनंती पाकिस्तानने अमान्य केली. एवढेच नव्हे तर जाधव यांच्यावर खटला चालविला जात आहे, हे तेथील भारतीय उच्चायोगाला कळविण्याचे सौजन्यही पाकिस्तानने दाखविले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अपहरण करून पाकिस्तानात नेले
जाधव यांस बलुचिस्तानात ‘हेरगिरी’ करताना पकडण्यात आले हेही पाकिस्तानने रचलेले एक कुभांड आहे.
मुळात कुलभूषण जाधव त्या देशात गेले कसे याचा कोणताही समाधानकारक खुलासा पाकिस्तानने कधीही केला नाही.
प्रत्यक्षात जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले होते, असा आरोप भारताने केला आहे.