लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत हा छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या शूरवीरांचा देश आहे, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी पहलगाम हल्ल्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर आवश्यक होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय माध्यम व प्रसिद्धी विभागप्रमुख सुनील अंबेकर यांनी बुधवारी म्हटले आहे.
साहित्य अकादमीमध्ये द लोकमाता, लाइफ अँड लेगसी ऑफ देवी अहिल्याबाई होळकर या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत आज अशा टप्प्यावर आहे, जेथे तो आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. आपल्यासाठी व्यापारही खूप महत्त्वाचा आहे. देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे शूर महिलांचा वारसा आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.