"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:35 IST2025-07-26T16:29:15+5:302025-07-26T16:35:05+5:30
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.

"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
Shivraj Singh Chauhan on Rahul Gandhi: जातनिहाय जनगणना न करणे ही माझी चूक असल्याची जाहीर कबुली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. ओबीसींच्या संरक्षणासाठी निर्णय घेण्यात मी कमी पडलो आणि आता ती चूक सुधारायची असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितल्यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या नशिबात माफी मागणेच असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस देशाचा विरोध करत पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचेही म्हटलं.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करताना त्यांनी देशालाच विरोध करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस कारगिल विजय दिनावरही प्रश्न उपस्थित करते. ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित करून पाप करत असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केलेल्या विधानवरही भाष्य केलं.
"काँग्रेस कारगिल विजयावर प्रश्न उपस्थित करते. २००४ ते २००९ पर्यंत यूपीए सत्तेत असताना कारगिल विजय दिन साजरा केला गेला नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने तर असेही म्हटलं की, हे युद्ध एनडीए सरकारच्या काळात लढले गेले होते, त्यामुळे आपण तो का साजरा करावा. त्यामुळे मला प्रश्न पडतो की जेव्हा एखादा देश युद्ध लढतो तेव्हा तो कोणत्याही सरकारसाठी लढतो का? असे प्रश्न उपस्थित करणे देशभक्ती आहे का?" असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.
"काँग्रेसने केवळ कारगिल युद्धावरच नव्हे तर ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित केले, जे चुकीचे आहे. काँग्रेस देशाचे नुकसान करण्यात गुंतलेली आहे आणि त्यांची विचारसरणी देशविरोधी बनली आहे. पंतप्रधान मोदींना विरोध करताना काँग्रेसने देशाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांचे नेते पाकिस्तानसारखे बोलतात. पण आम्ही आमच्या सैन्याच्या शौर्याचे नेहमीच कौतुक करतो," असेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
"राहुल गांधींना गोष्टी उशिराने समजतात. आधी त्यांनी आणीबाणीसाठी माफी मागितली, नंतर शीख दंगलींसाठी माफी मागितली आणि आता त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली आहे. काँग्रेसने ओबीसींसाठी काय केले आहे ते सांगावे. मंडल आयोगाचा अहवाल कोणी फेटाळला हे काँग्रेसने सांगावे. एवढेच नाही तर काँग्रेसने ओबीसींच्या कल्याणासाठी प्रत्येक पाऊल चिरडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यासाठी माफी मागितली. याआधी राहुल गांधींनी राफेल प्रकरणात माफी मागितली होती आणि आता ते १० वर्षांनी जे करत आहेत त्यासाठी माफी मागतील. माफी मागणे त्यांच्या नशिबात लिहिलेले आहे," असंही राहुल गांधी म्हणाले.