लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकता येणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील युद्धांसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितले.
‘विदेशी कंपन्यांकडून सध्या आयात होणाऱ्या यूएव्ही व अन्य प्रणालीतील महत्त्वाच्या घटकांची स्वदेशात निर्मिती’ या विषयावर दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, सध्या होणाऱ्या युद्धात कालच्या शस्त्रांनी विजय मिळवता येत नाही. आजचे युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानाने लढावे लागते. आपला भूप्रदेश व गरजांनुसार तयार केलेली स्वदेशी मानवविरहित विमान प्रणाली (यूएव्ही) व अन्य प्रणाली किती महत्त्वाच्या आहेत हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले. (वृत्तसंस्था)
युद्धात वाढले ड्रोन; शस्त्रास्त्र परदेशी नको, स्वदेशीच हवेजनरल चौहान म्हणाले की, ड्रोन युद्धामुळे अन्य युद्धसामग्रीच्या वापराबाबतही काही प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे मानवरहित विमानांचा होणारा विकास, त्या अनुषंगाने रणनीतीत होणारे बदल युद्ध लढताना विचारात घ्यावे लागतील.
आधुनिक तंत्रज्ञानासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा या प्रणाली विकसित कराव्या लागतील. विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपल्या युद्धसज्जतेत कमतरता निर्माण होते. परदेशी शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान याची सर्वांनाच माहिती असल्याने शत्रू आपल्या रणनीतीतील बारकावे सहजी ओळखू शकतो. त्यामुळे स्वदेशात शस्त्रास्त्र निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. चौहान म्हणाले की, ड्रोनचा अलीकडील युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यांचा आकार, त्यांची किंमत यांचा योग्य ताळमेळ घालून ड्रोनची निर्मिती होत असून त्यांची युद्धात उपयुक्तताही वाढली आहे.