इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:44 IST2025-02-03T13:44:01+5:302025-02-03T13:44:14+5:30

ISRO's NVS-02 Mission: गेल्या चार दिवसांपासून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. परंतू काहीच पर्याय निघत नाहीय. १०० वी मोहिम असल्याने महत्वाची होती...

ISRO's NVS-02 Mission: ISRO's 100th mission gets stuck in space; satellite won't go any further, scheduled to launch on January 29 | इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला

इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला

इस्रोचे १०० वी अंतराळ मोहिम जवळपास अडचणीत आली आहे. २९ जानेवारीला पाठविण्यात आलेला उपग्रह NVS-02 अंतराळातच अडकला आहे. यामुळे त्याच्या निर्धारित कक्षेत तो जाऊ शकलेला नाही. उपग्रहाची प्रोपल्शन सिस्टिम फेल झाली असून यामुळे तो कधीच पुढच्या कक्षेत जाऊ शकणार नाही. 

एक वॉल्व नादुरुस्त झाल्याने ही वेळ आली आहे. हा बिघाड दुरुस्त करता येण्यासारखा नाहीय. अपोजी मोटर म्हणजेच LAM ला सुरु करण्यासाठी हा वॉल्व ऑक्सिडायझरचा पुरवठा करतो. आता ऑक्सिडायझरच मोटरला मिळू शकणार नसल्याने लॅमही सुरु होणार नाही. याचाच अर्थ हा उपग्रह आता अंतिम कक्षेपर्यंत जाऊ शकणार नाही. 

रविवारपर्यंत हा उपग्रह जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्येच अडकलेला होता. या कक्षेचा वापर उपग्रहाला त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचविण्यासाठी केला जातो. हा नेव्हिगेशन सॅटेलाईट आहे. त्याला काम करण्यासाठी गोल कक्षेची गरज असते. एलएएम प्रज्वलित झाल्याशिवाय हे शक्य नाहीय. लाँच झाल्यानंतरच इस्रोच्या ही बाब लक्षात आली होती. 

जीटीओ कक्षेत गेल्यानंतर यात काहीच सुधारणा झालेली नाही. हा वॉल्वच खुला होत नाहीय. यावरून इस्रोमध्ये एकामागोमाग एक बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून हे सुरु आहे. अंतराळ यानाची सर्व प्रणाली योग्य प्रकारे काम करत आहे. उपग्रह नियंत्रित करण्यासही यंत्रणा कार्यक्षम आहे. परंतू, आता ज्या कक्षेत हा उपग्रह अडकला आहे, तिथेच तो कार्यन्वित करायचा का असा प्रश्न इस्रोसमोर आहे. या उपग्रहामध्ये एक आण्विक घड्याळही आहे. 

चांद्रयान २ मध्येही आलेली समस्या...

इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेमध्येही अशाच समस्या आल्या होत्या. प्रज्ञान रोव्हरला घेऊन जाणारा विक्रम लँडर चंद्रावर नीट उतरू न शकल्याने आदळला होता. यापासून धडा घेत इस्रोने चांद्रयान ३ मोहिम यशस्वी केली होती. ही वेगळ्या प्रकारची मोहिम असली तरी आताचा हा अंतराळात पृथ्वीभोवती घिरट्या घालू शकणारा उपग्रह आहे.  

Web Title: ISRO's NVS-02 Mission: ISRO's 100th mission gets stuck in space; satellite won't go any further, scheduled to launch on January 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो