इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:58 AM2018-08-16T05:58:56+5:302018-08-16T06:01:13+5:30

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवी मजल गाठत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती अध्यक्ष के. सिवान यांनी बुधवारी येथे दिली.

ISRO's 'Gaganayan' will carry astronauts - K Sivan | इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान

इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवी मजल गाठत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती अध्यक्ष के. सिवान यांनी बुधवारी येथे दिली. गगनयान मोहिमेंतर्गत चार वर्षांत अवकाशात मानव पाठविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मानव क्रू मोड्यूल व पर्यावरण नियंत्रण तसेच जीवनरक्षक प्रणालीसारखे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. इस्रोने २०२२मध्ये प्रक्षेपणापूर्र्वी दोन मानवरहित मिशनची व एक यान पाठविण्याची तयारी केली आहे. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क-३च्या आधारे हे यान अवकाशात सोडले जाईल.
२०२२मध्ये अंतराळवीर अवकाशात तिरंगा फडकावतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात केल्यानंतर काही वेळात सिवान यांनी मोहिमेची माहिती दिली. अंतराळात मानव पाठविण्याची मोहीम फत्ते केल्यास अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरेल. वायुदलाचे माजी वैमानिक राकेश शर्मा हे अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले होते. ते तत्कालीन सोव्हियत युनियनच्या सोयूझ टी-११ मोहिमेत सहभागी झाले होते. २ एप्रिल १९८४ला सोयूझ यानाचे प्रक्षेपण झाले होते. यापूर्वी कल्पना चावला आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनीही अंतराळप्रवास केला होता. अमेरिकेचे कोलंबिया यान पृथ्वीच्या वातावरणात परतताना नष्ट झाले होते. त्यात कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

इस्रोच्या कामगिरीतील टप्पे
डिसेंबर २०१४ मध्ये सार्क उपग्रह शेजारी देशांना भेट.
दक्षिण आशियाई राष्टÑांसाठी मे २०१७ मध्ये उपग्रहाचे प्रक्षेपण.
मानवी जीवनावर प्रभाव पाडणारे प्रकल्प राबविण्यात पुढाकार
चांद्रयान-१ आणि मंगळयान मिशनमुळे गाठला मैलाचा दगड.
पुढील वर्षी चांद्रयान-२चे प्रक्षेपण. रोव्हर यान चंद्रावर उतरणार.

मानवरहित यानासाठी आवश्यक तंत्रज्ञान यापूर्वीच विकसित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिलेली कालमर्यादा पाळणे शक्य आहे. किमान एक दशकापूर्वीच आम्ही त्या दिशेने काम सुरू केले होते.
- के. सिवान,
इस्रोचे अध्यक्ष

‘गगनयान मिशन’ हे इस्रोसाठी
टर्निंग पॉइंट ठरेल. गगनयानाबाबत पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि ‘इस्रो’तर्फे झालेली घोषणा महत्त्वपूर्ण आहे.
- के. राधाकृष्णन, इस्रोचे माजी अध्यक्ष

Web Title: ISRO's 'Gaganayan' will carry astronauts - K Sivan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.