इस्रोची 'ड्रोग पॅराशूट'ची चाचणी यशस्वी; अवकाशवीर पृथ्वीवर सुरक्षित उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 06:05 IST2025-12-21T06:04:52+5:302025-12-21T06:05:16+5:30
इस्रोच्या मते, यानाचा वेग कमी करण्याची मालिका पॅराशूट चेंबरमधून संरक्षक कव्हर काढून टाकण्यापासून सुरू होते.

इस्रोची 'ड्रोग पॅराशूट'ची चाचणी यशस्वी; अवकाशवीर पृथ्वीवर सुरक्षित उतरणार
बंगळुरू : इस्रोने गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलचा वेग कमी करणारी ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. या चाचण्या १८ आणि १९ डिसेंबर रोजी चंडीगडमधील टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळेच्या (टीबीआरएल) युनिटमध्ये घेण्यात आल्या होत्या. क्रू मॉड्यूलच्या माध्यमातून अवकाशवीरांना पृथ्वीवर आणले जाते. यासाठी विशिष्ट पॅराशूट लागतात. गगननयानच्या मोहिमेत चार प्रकारचे १० पॅराशूट आहेत. या चाचण्यांमुळे यानाच्या विविध उड्डाण परिस्थितींमध्ये ड्रोग पॅराशूट्सची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली असून, मानवी अंतराळ प्रवासातील ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
इस्रोच्या मते, यानाचा वेग कमी करण्याची मालिका पॅराशूट चेंबरमधून संरक्षक कव्हर काढून टाकण्यापासून सुरू होते. त्यानंतर दोन ड्रोग पॅराशूट सज्ज केले जातात. तीन पायलट हे पॅराशूट उघडतात. हे मुख्य पॅराशूट क्रू मॉड्यूलची गती आणखी कमी करतात, ज्यामुळे पृथ्वीवर क्रू मॉडेलचे सुरक्षित लैंडिंग होते. इस्रोने या संदर्भातील माहिती 'एक्स'वर प्रसिद्ध केली आहे.
क्रू मॉड्युलच्या वेग कमी करणाऱ्या प्रणालीमध्ये चार प्रकारचे एकूण दहा पॅराशूट्स समाविष्ट असतात. क्रू मॉडेल उतरण्याच्या वेळी सुरुवातीला दोन एपेक्स कव्हर सेपरेशन पॅराशूट्स उघडली जातात. हे पॅराशूट्स पॅराशूट विभागाचे संरक्षक आवरण वेगळे करतात. त्यानंतर दोन ड्रोग पॅराशूट्स कार्यान्वित होतात, जे क्रू मॉड्युल स्थिर ठेवत त्याचा वेग कमी करतात. हा वेग कमी करत जाणे अत्यंत महत्त्वाचे जोखीमीचे असते.
नंतर तीन पायलट पॅराशूट्स उघडले जातात. ते तीन मुख्य पॅराशूट्स बाहेर काढतात. मुख्य पॅराशूट्समुळे क्रू मॉड्युलचा वेग लक्षणीयरीत्या कमी होत जातो. या टप्प्यात वेगावर नियंत्रण आल्याने सुरक्षित लैंडिंग होते.