'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 07:37 IST2025-11-03T07:37:07+5:302025-11-03T07:37:22+5:30
हा उपग्रह पुढील १५ वर्षे कार्यरत राहील

'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
श्रीहरीकोटा: इस्रोच्या अवकाश प्रवासात रविवारी एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. इस्रोने तयार केलेल्या 'बाहुबली' (एलव्हीएम-३) या शक्तिशाली रॉकेटने ४,४१० किलो वजनाच्या 'सीएमएस-३' या उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत यशस्वीपणे प्रक्षेपित केले. या उपग्रहाला अवकाशात पाठविण्यासाठी तेवढाच अवजड म्हणजे ६४२ टन वजनाचे, ४३.५ मीटर उंचीचे 'बाहुबली' रॉकेट तयार करण्यात आले होते.
५,८५४ किलोचा 'जीसॅट-११' हा उपग्रह डिसें. २०१८ रोजी अवकाशात सोडला होता. त्याने भारताची ताकद आणखी वाढली. इस्रोची 'बाहुबली मोहीम' ही विशेष करून भारतीया नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी हाती घेण्यात आली आहे. हा उपग्रह पुढील १५ वर्षे कार्यरत राहील. यामुळे नौदलाची अवकाशस्थित दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि हिंदी महासागर क्षेत्रावर देखरेखही ठेवता येणार आहे.
५.२६ मिनिटांनी रॉकेट अवकाशात झेपावले व काही मिनिटांत इस्रोने रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे व उपग्रह ठरवून दिलेल्या कक्षेत पोहोचल्याची आनंदाची बातमी देशवासीयांना दिली.
क्षण अभिमानाचा
चांद्रयान-३० नंतरचे 'बाहुबली चे यशस्वी प्रक्षेपण भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया इस्रोचे संचालक व्ही. नारायणन यांनी दिली. राष्ट्रपती अन् पंतप्रधान यांनी यासाठी इस्रोचे अभिनंदन केले. क्रायोजेनिक टप्प्यांची ही पहिलीच चाचणी होती. त्यामुळे अनेक उपग्रह अवकाशात सोडता येतील.