ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:21 IST2025-06-09T19:19:32+5:302025-06-09T19:21:21+5:30
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त 'Ax-4' मिशनअंतर्गत १० जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत.

ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
भारतीय अंतराळ विज्ञानाच्या वाटचालीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त 'Ax-4' मिशनअंतर्गत १० जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) झेपावणार आहेत. राकेश शर्मा यांच्या १९८४मधील अंतराळ प्रवासानंतर, शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे राष्ट्रीय भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत.
इस्रोने केली ऐतिहासिक मिशनची अधिकृत घोषणा
इस्रोने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून या ऐतिहासिक मिशनची माहिती दिली आहे. सामान्य जनतेला घर बसल्या हा क्षण पाहता येणार आहे. याचे प्रक्षेपण १० जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.४५ वाजता युट्यूबवर थेट पाहता येणार असून, प्रत्यक्ष लाँचिंग संध्याकाळी ५.५२ वाजता होणार आहे. याचे थेट प्रक्षेपणासाठी https://www.youtube.com/live/J1xfppWABZo या लिंकवर पाहता येईल.
वैमानिक ते अंतराळवीर, शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
लढाऊ वैमानिक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शुभांशू शुक्ला यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. 'Ax-4' मिशनसाठी तयार केलेल्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, “मी लहानपणापासून राकेश शर्मा यांच्या कथा ऐकत आलो. अंतराळात जाणे हे माझ्या स्वप्नाचं प्रत्यक्षात उतरणं आहे. हा फक्त एक वैयक्तिक क्षण नाही, तर भारतातील मुला-मुलींना विज्ञान आणि अंतराळ संशोधनासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे.”
जागतिक सहकार्याचे प्रतीक
Ax-4 मिशन हे Axiom Spaceद्वारे आयोजित केले जात असून, हे बहुराष्ट्रीय अभियान चार अंतराळवीरांना घेऊन ISSवर जाणार आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (भारत) – मिशन पायलट
स्लावोझ उझनान्स्की (पोलंड) – ESA प्रकल्प अंतराळवीर
टिबोर कपू (हंगेरी) – राष्ट्रीय अंतराळवीर
पेगी व्हिटसन (USA) – मिशन कमांडर (अंतराळात सर्वाधिक वेळ घालवणारी महिला)
अंतिम टप्प्याची तयारी पूर्ण
८ जून रोजी Ax-4 टीमने SpaceX टीमसोबत यशस्वीरित्या ड्रेस रिहर्सल पार पाडली आहे. मिशनसाठी वापरण्यात येणारी crew Dragon कॅप्सूलही पूर्णपणे तपासली गेली आहे.
भारतासाठी अभिमानाचा क्षण
शुभांशू शुक्लांचा अंतराळ प्रवास हा केवळ वैज्ञानिक कामगिरी नसून, भारताच्या युवा पिढीसाठी प्रेरणेचा प्रकाशस्तंभ ठरणार आहे. १९८४च्या ऐतिहासिक क्षणानंतर भारतीय अंतराळ मोहिमांमध्ये आता नवीन युगाची सुरुवात होत आहे.