शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:11 IST2025-11-02T18:10:52+5:302025-11-02T18:11:38+5:30
ISRO ने आज भारतीय नौदलाचे 4400 किलो वजनी, अत्याधुनिक ‘CMS-03 (GSAT-7R)’ सॅटेलाईट लॉन्च केले.

शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
श्रीहरिकोटा - भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आज (2 नोव्हेंबर 2025) ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय नौदलासाठी तयार केलेले CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात जड आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाईट ठरले आहे.
हे सॅटेलाईट इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:26 वाजता अवकाशात सोडण्यात आले.
‘GSAT-7R’ म्हणजे काय?
GSAT-7R हे एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जे भारतीय नौदलाच्या जहाजे, विमाने, पाणबुड्या आणि किनारी नियंत्रण केंद्रांना एकत्रित व सुरक्षित संवादात जोडेल. हे सॅटेलाईट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले असून, ‘आत्मनिर्भर भारत’ चा एक ठोस पुरावा आहे. याचे वजन सुमारे 4400 किलोग्रॅम असून, यात अनेक देशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रान्सपोंडर्स बसवण्यात आले आहेत. हे उपकरण आवाज, डेटा आणि व्हिडिओ कम्युनिकेशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्सवर सक्षमपणे हाताळतील.
Liftoff! #LVM3M5 launches #CMS03 from SDSC SHAR, carrying India’s heaviest communication satellite to GTO.
— ISRO (@isro) November 2, 2025
Youtube URL:https://t.co/gFKB0A1GJE
For more Information Visithttps://t.co/yfpU5OTEc5
टेक्निकल फिचर्स
वजन: सुमारे 4400 किलो (भारताचे सर्वात जड कम्युनिकेशन सॅटेलाईट)
ट्रान्सपोंडर्स: व्हॉइस, डेटा आणि व्हिडिओ लिंकसाठी विविध बँड्सवर सक्षम
कव्हरेज एरिया: संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात स्थिर व मजबूत सिग्नल
हाय बँडविड्थ कनेक्टिव्हिटी: नौदलाच्या जहाजांपासून नियंत्रण केंद्रांपर्यंत अखंड व सुरक्षित डेटा ट्रान्सफर
दीर्घकालीन कार्यक्षमता: अनेक वर्षे अवकाशात सक्रिय राहण्याची क्षमता
भारतीय नौदलासाठी का महत्त्वाचे?
आजच्या काळात समुद्री सुरक्षा आणि गुप्तचर माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून वाढलेल्या आव्हानांमध्ये GSAT-7R नौदलासाठी एक धोरणात्मक ढाल ठरेल.
सुरक्षित संवाद: जहाजे, पाणबुड्या आणि कमांड सेंटरमध्ये थेट व एनक्रिप्टेड कम्युनिकेशन
निगराणी वाढणार: समुद्रातील शत्रूंच्या हालचालींवर सतत नजर ठेवणे शक्य होईल
अंतराळातून नियंत्रण: नौदलाच्या ऑपरेशन्सना रिअल-टाइम डेटा आणि कम्युनिकेशन सपोर्ट मिळेल
स्वदेशी तंत्रज्ञान: परदेशी उपग्रहांवर अवलंबित्व कमी होऊन भारताची तांत्रिक स्वायत्तता वाढेल
पंतप्रधान व संरक्षण दलांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या या यशाचे कौतुक करत म्हटले की, CMS-03 हे भारताच्या समुद्री सुरक्षेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. तर नौदल प्रमुखांनी सांगितले की, हे सॅटेलाईट भारताच्या ‘मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस’ क्षमतेला नवे बळ देईल आणि राष्ट्रीय सुरक्षेला मजबुती मिळवून देईल.