isro to launch gisat 1 satellite in valentines week will help in defence disaster management | इस्रो देणार 'लय भारी' व्हॅलेंटाईन गिफ्ट; संकटग्रस्तांचे जीव वाचणार, पाकला झटका बसणार!

इस्रो देणार 'लय भारी' व्हॅलेंटाईन गिफ्ट; संकटग्रस्तांचे जीव वाचणार, पाकला झटका बसणार!

पुढील महिन्यात जगभरासह भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कित्येक जण त्यांच्या प्रेमाची कबुली देतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थादेखील (इस्रो) याला अपवाद नसेल. देशाच्या संरक्षणात, आपत्ती व्यवस्थानात उपयोगी ठरणारं असं अमूल्य गिफ्ट इस्रो याच कालावधीत देशाला देईल. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इस्रोकडून जीआयसॅट-१ (GiSAT-1) उपग्रह अवकाशात सोडणार आहे. 

जीआयसॅट-१ उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकाच ठिकाणी थांबून देशाच्या सीमांची टेहळणी करेल. हा उपग्रह दर अर्ध्या तासाला देशाचा एक फोटो पाठवेल. यामुळे पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरील हालचालींची माहिती सतत मिळत राहील. पाकिस्तानमधून सतत भारतीय हद्दीत घुसखोरींचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर अंतराळातून जीआयसॅट-१ रुपी तिसरा डोळा लक्ष ठेवेल. 

जीआयसॅट-१ मध्ये पाच प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. इस्रो जीआयसॅट मालिकेतले दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहे. जीआयसॅट-१ च्या प्रक्षेपणानंतर इस्रो जीआयसॅट-२ अवकाशात पाठवेल. जीआयसॅट-१चं प्रक्षेपण १५ जानेवारीला करण्यात येणार होतं. इस्रोनं ही तारीख जाहीरदेखील केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यानं हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं. आंध्रप्रदेशातल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून जीआयसॅट-१ चं प्रक्षेपण करण्यात येईल. या मोहिमेत जीएसएलव्ही-एके२ प्रक्षेपक म्हणून काम करेल.
 
जीआयसॅट-१ मध्ये कार्टोसेट उपग्रहात अतिशय सामर्थ्यशाली पॅनक्रोमॅटिक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा अर्ध्या तासानं देशाचा फोटो काढेल. याशिवाय उपग्रहातले बाकीचे कॅमेरेदेखील सतत फोटो टिपून ते इस्रोला पाठवतील. जीआयसॅट-१ केवळ दिवसाच फोटो काढू शकतो. रात्रीचे फोटो टिपण्यासाठी इस्रो जीआयसॅट मालिकेतला दुसरा उपग्रह अवकाशात सोडणार आहे. 
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: isro to launch gisat 1 satellite in valentines week will help in defence disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.