सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 10:29 IST2023-09-05T10:24:11+5:302023-09-05T10:29:13+5:30
ISRO Aditya-L1 Mission: आदित्य एल-१ चा प्रवास कुठपर्यंत झाला आहे? आता पुढील प्रक्रिया काय आणि कधी होईल? याबाबत इस्रोने महत्त्वाची माहिती दिली आहे.

सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट
ISRO Aditya L1 Mission: चंद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. आदित्य- एल १ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर आता सूर्याच्या दिशेने खरा प्रवास सुरू झाला आहे. आदित्य एल-१ हे काही काळ पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण केल्यानंतर सूर्याच्या दिशेने झेप घेणार आहे. याबाबत इस्रोने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आदित्य एल-१ कुठपर्यंत पोहोचले आहे. याबाबत इस्रोने एक्सवर (ट्विटरवर) महत्त्वाची माहिती दिली आहे. आदित्य एल-१ सध्या पृथ्वीपासून २८२x४०२२५ किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत पोहोचला आहे. आदित्य एल-१ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचले आहे. आदित्य एल-१ पृथ्वीला दुसऱ्या कक्षेत पोहोचवायची प्रतिक्रिया बंगळुरू येथील ISTRAC सेंटरमधून पार पाडण्यात आली. आदित्य एल-१ चा प्रवास मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील केंद्रांवरून ट्रॅक करण्यात येत आहे. आज पहाटे ०२ वाजून ४५ मिनिटांनी आदित्यचे दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर पार पडल्याचे इस्रोने सांगितले आहे.
१० सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत
आदित्य एल-१ पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाठवण्याची प्रक्रिया १० सप्टेंबर रोजी पार पडेल. या दिवशी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हे मॅन्यूव्हर करण्यात येईल. हा उपग्रह सुस्थितीत असून, मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचे इस्रोने स्पष्ट केले. अंतराळात सुमारे १२५ दिवस प्रवास केल्यानंतर हे यान सूर्याजवळच्या लाग्रांज-१ भागाजवळ पोहोचणार आहे. आदित्य L1 चा L1 लाग्रांज पॉइंट १ चे प्रतिनिधित्व करतो. आदित्य एल-१ च्या मुक्कामाचे ठिकाण पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर असेल. चंद्राचे तीन लाख ८५ हजार किलोमीटर अंतर विचारात घेतले तर हे अंतर चौपट-पाचपट वाटेल; पण सूर्याच्या एकूण अंतरापैकी हे १५ लाख किलोमीटर म्हणजे जेमतेम एक टक्का आहे. कारण, आपण सूर्यापासून तब्बल १५० दशलक्ष अर्थात १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहोत.
दरम्यान, आदित्य एल-१ लोअर अर्थ ऑर्बिटपासून प्रवासाला सुरुवात करेल. चंद्रयान ३ प्रमाणे आदित्य एल-१ पृथ्वीच्या कक्षेत सुरुवातीला भ्रमण करेल. PSLV-XL रॉकेट ठरल्यानंतर आदित्य एल-१ ला LEO मध्ये सोडेल. पृथ्वीच्या कक्षेत १६ दिवस फिरताना पाच ऑर्बिट मॅन्यूव्हर केले जातील. त्यानंतर आदित्य एल-१ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर जाईल. इथून आदित्य एल-१चा हॅलो ऑर्बिटच्या दिशेने प्रवास सुरु होईल. आदित्य एल-१ ला या प्रवासाला सुमारे १०९ दिवस लागतील. आदित्य एल-१ ला दोन मोठ्या ऑर्बिटमध्ये जायचे आहे. हा प्रवास कठीण असेल, असे म्हटले जात आहे.