सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात इसिसचा भारतातील म्होरक्या ठार

By Admin | Updated: April 25, 2016 15:21 IST2016-04-25T08:58:29+5:302016-04-25T15:21:19+5:30

सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन विमानाच्या हल्ल्यात इसिसचा दहशतवादी मोहम्मद शफी ठार झाला आहे. मोहम्मद शफी इसिसचा भारतातील प्रमुख होता.

ISIS's Indian commander killed in drone strike in Syria | सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात इसिसचा भारतातील म्होरक्या ठार

सीरियामध्ये ड्रोन हल्ल्यात इसिसचा भारतातील म्होरक्या ठार

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २५ - सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन विमानाच्या हल्ल्यात इसिसचा दहशतवादी मोहम्मद शफी ठार झाला आहे. मोहम्मद शफी इसिसचा भारतातील प्रमुख म्होरक्या होता. त्याच्याकडे भारतातून इसिसमध्ये तरुणांची भरती करायची जबाबदारी होती. 
 
काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये अमेरिकन ड्रोन विमानाच्या हल्ल्यामध्ये तो ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. युसूफ म्हणून ओळखला जाणारा शफी इसिसचा प्रमुख अबु बाकर अल बगदादीचा महत्वाचा सहकारी होता. भारतातील इसिसला बळ देण्यासाठी तो बगदादीला मदत करत होता. 
 
त्याने इसिसमध्ये ३० जणांची भरती केली होती. त्यातील २३ जणांना एनआयए आणि अन्य राज्यातील पोलिसांनी मागच्या दीडवर्षात अटक केली. भारतातील प्रत्येक राज्यात इसिसचे जाळे उभारण्याची त्याची योजना होती. 
 
२६ वर्षांचा शफी मूळचा कर्नाटकातील भटकळ गावचा होता. त्याच्या मृत्यूमुळे इसिसचे भारतातील नेतृत्व खिळखिळे झाले असून, भारतातून तरुणांच्या भरती प्रक्रियेला आळा बसेल असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.  त्याचा मोठा भाऊ सुल्तान अरमारकडे मागच्यावर्षी पर्यंत भारताची जबाबदारी होती. पण तो ही मार्च २०१५ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. 
 
इंटरपोलच्या वेबसाईटवरही शफीचे नाव होते. त्याने अन्सर उल तौहीद विसर्जित करुन जुनूद अल खलीफा इ हिंदची स्थापना केली होती. इंडियन मुजाहिदीनमध्ये रियाझ आणि इक्बलाल भटकळ बरोबर मतभेद झाल्यानंतर शफी आणि सुल्तानने अन्सर उल तौहीदची स्थापना केली होती. दहशतवादासाठी मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्यावरुन त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. 
 

Web Title: ISIS's Indian commander killed in drone strike in Syria