इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 06:08 IST2025-12-14T06:07:24+5:302025-12-14T06:08:29+5:30
ईडीने या प्रकरणी बोरीवली-पडघा ही गावे तसेच दिल्ली, कोलकाता, हजारीबाग (झारखंड) आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील विविध ठिकाणी ईडीने गुरुवारी छापे टाकले होते.

इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातून इसिसच्या मॉड्युलने स्थानिक राखीव जंगलातून खैर लाकूड अवैधरित्या तोडून त्याची तस्करी केली होती, अशी माहिती दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केलेल्या तपासात उघड झाली आहे. शनिवारी त्याची माहिती दिली.
ईडीने या प्रकरणी बोरीवली-पडघा ही गावे तसेच दिल्ली, कोलकाता, हजारीबाग (झारखंड) आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील विविध ठिकाणी ईडीने गुरुवारी छापे टाकले होते. इसिसचे पडघा येथील साथीदार तसेच या संघटनेचा भारतातील स्वयंघोषित नेता साकिब नाचन याच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०२३मध्ये गुन्हा दाखल केला होता.
३.७० कोटींची रक्कम, ६ कोटींचे सोने, दागिने जप्त
१. ईडीने शनिवारी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी पडघा व विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ३.७० कोटींची रोख रक्कम, सुमारे ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
२. बोरीवली-पडघा येथील इसिस मॉड्युलशी संबंधित व्यक्ती या भागातील राखीव जंगल क्षेत्रातून खैर झाडांची तस्करी करण्यात गुंतलेल्या होत्या. खैरापासून तयार केलेला कात हा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात.
कात खरेदी करणाऱ्या कंपन्यांचीही चौकशी, जप्त लाकूड वनविभागाकडे
पडघा येथील मॉड्युलशी संबंधित लोकांकडून कात खरेदी करणाऱ्या कंपन्यांचीही चौकशी गुरुवारी करण्यात आली. या छाप्यामध्ये जप्त करण्यात आलेले खैराचे लाकूड ईडीने वनविभागाकडे सुपुर्द केले आहे.