रस्ता खराब आहे?, ठेकेदारास करा लगेच कॉल; रस्त्यांवर ‘क्यूआर कोड’ लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:39 IST2025-11-04T14:38:35+5:302025-11-04T14:39:02+5:30
हे पाऊल धाडसी आणि दूरदर्शी: आयआरएफ

रस्ता खराब आहे?, ठेकेदारास करा लगेच कॉल; रस्त्यांवर ‘क्यूआर कोड’ लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर लवकरच ‘क्यूआर कोड’ बसवले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना संबंधित रस्त्यांची सविस्तर माहिती मिळणार आहे. यात ठेकेदाराचे नाव, जबाबदार अधिकारी, त्यांचे संपर्क क्रमांक आणि आपत्कालीन हेल्पलाइन नंबर मिळेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
या प्रणालीने काय होणार?
या प्रणालीमुळे महामार्गांवरील कामांच्या गुणवत्तेवर रिअल-टाइम (प्रत्यक्ष) तपासणी करता येईल. प्रवाशांना एखाद्या ठिकाणी समस्या आल्यास क्यूआर कोड स्कॅन करून थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.
एका स्कॅनमधूनच सर्व आवश्यक माहिती मिळवा
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अलीकडेच सांगितले की, “राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणारे नागरिक लवकरच एका स्कॅनमधूनच सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतील. हे साइन बोर्ड प्रवाशांसाठी माहिती आणि आपत्कालीन मदतीचे माध्यम ठरतील. यामुळे रस्ता बांधकामातील पारदर्शकता, जबाबदारी आणि सार्वजनिक विश्वास वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
रस्ते नेटवर्क अधिक सुरक्षित होणार?
आयआरएफ या जागतिक संस्थेने या निर्णयाचे स्वागत करत, याला धाडसी, दूरदर्शी पाऊल म्हटले. ‘आयआरएफ’चे मानद अध्यक्ष के. के. कपिला म्हणाले, भारतीय रस्त्यांची गुणवत्ता व त्यांची देखभाल यामध्ये सुधारणा करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर ही अत्यंत नावीन्यपूर्ण कल्पना आहे. या मुळे रस्ते नेटवर्क अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि जबाबदार व्यवस्थापनाखाली राहील.