Odia Woman Viral Video: अमेरिकेत दत्तक म्हणून गेलेल्या ओडिशाच्या एका युवतीने अचानक आपल्या दत्तक आईवर केलेले शारीरिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचे आरोप खोटे ठरले आहेत. या युवतीला परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर तातडीने भारतात परत आणले गेले, पण मायदेशी पाऊल ठेवताच तिने आपले सर्व आरोप फेटाळून लावले. केवळ एका व्यक्तीसाठी आणि भारतात परत येण्यासाठी हे संपूर्ण नाटक रचल्याचे तिने कबूल केले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती.
व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, स्वतःला पूजा म्हणवणाऱ्या २१ वर्षीय युवतीने १३ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून मोठी खळबळ उडवून दिली होती. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या अमेरिकन दत्तक आईवर गंभीर आरोप केले होते. "मी अमेरिकेत आल्यापासून अजिबात आनंदी नाही. जेव्हा मी भारतात होते, तेव्हा खूप आनंदी होती आणि मला परत जायचे आहे. मी मुख्यमंत्री मोहन बाबू यांना मला ओडिशाला परत आणण्यास मदत करण्याची विनंती करते. त्या (दत्तक आई) ख्रिश्चन आहेत आणि मी हिंदू मुलगी आहे. त्या मला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत आहेत. जेव्हा मी नकार देते, तेव्हा त्या माझा छळ करतात," असं तिने म्हटले होते. तिने शारीरिक आणि मानसिक छळाचाही आरोप केला होता.
परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर 'घर वापसी'
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओडिशाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले. यानंतर मंत्रालयाने तातडीने दखल घेऊन पूजाला आपत्कालीन पासपोर्टवर ओडिशा येथे परत आणले. मंगळवारी पूजाचे भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाऊल ठेवला आणि या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. भारतात परत येताच पूजाने दत्तक आईवर केलेल सर्व आरोप मागे घेतले.
"मी व्हिडिओमध्ये जे काही सांगितले, ते सर्व खोटे आहे. मी ते व्हिडिओ फक्त ओडिशाला परत येण्यासाठी बनवले होते. माझ्या दत्तक आईने मला कधीही त्रास दिला नाही किंवा धर्मांतरासाठी जबरदस्ती केली नाही. मी खोटे बोलले आणि स्वतःच हे व्हिडिओ तयार केले." तिने अमेरिकेतील अधिकाऱ्यांना विनंती केली की, तिच्या दत्तक आईची त्वरित सुटका करावी.
या नाट्यमय घडामोडीमागील खरे कारण विचारले असता, पूजाने सांगितले की, ती बालासोरमधील एका तरुणावर प्रेम करते आणि त्याला भेटण्यासाठी तिला ओडिशाला परत यायचे होते. तो तरुण तिच्यासोबत शाळेत शिकत होता आणि २०२४ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा पुन्हा संपर्क झाला.
पूजाने 'इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले, "तो माणूस मला आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मला भारतात परत येता यावे यासाठी खोटे आरोप करून व्हिडिओ बनवण्याची कल्पना माझीच होती. मला अमेरिकेची जीवनशैली आवडत नव्हती. मी छळ आणि धर्मांतराचे जे आरोप केले, ते पूर्णपणे खोटे आहेत."
दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये बंगळुरूहून सुटका झाल्यानंतर या मुलीला ओडिशातील बालासोर येथील चाइल्डकेअर होममध्ये ठेवण्यात आले होते आणि २०१८ मध्ये तिला भुवनेश्वरच्या एका चाइल्डकेअर होममधून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका अविवाहित महिलेने दत्तक घेतले होते.
सध्या बालासोर जिल्हा प्रशासनाने पूजाला रिलीफ ॲण्ड रिहॅबिलिटेशन होम ठेवले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "तिचा इथे कोणताही जवळचा नातेवाईक नाही. त्यामुळे आम्ही प्रथम तिच्या मागील नोंदी आणि ज्या व्यक्तीसोबत तिला राहायचे आहे, त्याच्या पार्श्वभूमीची तपासणी करू. कायदेशीररित्या जे शक्य असेल ते केले जाईल."
Web Summary : An Odisha girl, adopted in US, falsely accused her adoptive mother of abuse to return to India. She confessed it was a lie to reunite with a lover. Authorities are investigating.
Web Summary : अमेरिका में दत्तक ली गई ओडिशा की एक लड़की ने भारत लौटने के लिए अपनी दत्तक माँ पर दुर्व्यवहार का झूठा आरोप लगाया। उसने कबूल किया कि यह प्रेमी से मिलने के लिए झूठ था। अधिकारी जांच कर रहे हैं।