अधिक मोठ्या घरांसाठी कर्जांवर व्याज अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना; मध्यमवर्गीयांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:26 IST2017-11-17T02:25:48+5:302017-11-17T02:26:10+5:30
प्रधानमंत्री नागरी आवास योजनेखाली मध्यमवर्गीयांना घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात अनुदान योजनेचा लाभ अधिक मोठ्या घरांसाठीही उपलब्ध करून देण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.

अधिक मोठ्या घरांसाठी कर्जांवर व्याज अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना; मध्यमवर्गीयांना लाभ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नागरी आवास योजनेखाली मध्यमवर्गीयांना घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात अनुदान योजनेचा लाभ अधिक मोठ्या घरांसाठीही उपलब्ध करून देण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.
एमआयजी-१ वर्गातील घरांसाठीच्या ९ लाखांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजात चार टक्के तर एमआयजी-२ मधील घरांच्या १२ लाखांपर्यंतच्या कर्जात ३ टक्के अनुदान मिळेल. अनुदानाचे प्रमाण, कर्जमर्यादा कायम ठेवून ते मोठ्या घरांसाठी लागू होईल. योजना ३१ मार्च २०१९ पर्यंत असेल.
किती वाढविली मर्यादा-
ंया योजनेखाली मध्यमवर्गांचे एमआयजी-१ व एमआयजी-२ असे दोन गटांत वर्गीकरण केलेले आहे. सहा ते १२ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेले एमआयजी १ मध्ये तर १२ ते १८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले एम आयजी-२ मध्ये येतात. पूर्वी एमआयजी-१ साठी या अनुदानासाठी घराचे कमाल आकारमान ९० चौ. मीटर तर एमआयजी-२ साठी तमाल ११० चौ. मी. ठरले होते. ते आता अनुक्रमे १२० व १५० चौ. मीटरपर्यंत वाढविण्यात आले आहे.
शिवाय घरांच्या आकारातील हा बदल ज्या दिवशी अनुदान योजना सुरु झाली त्या दिवसापासून म्हणजे यंदाच्या १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने झाल्याचे मानले जाईल.