‘आयएनएसव्ही तारीणी’चे बांधकाम गोव्यातच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 20:25 IST2018-05-21T20:25:59+5:302018-05-21T20:25:59+5:30
नौदलाच्या सहा महिला अधिका-यांनी ज्या ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून विश्वभ्रमण केले ती बोट गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.

‘आयएनएसव्ही तारीणी’चे बांधकाम गोव्यातच!
- किशोर कुबल
वेरें (गोवा) - नौदलाच्या सहा महिला अधिका-यांनी ज्या ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून विश्वभ्रमण केले ती बोट गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.
५५ फूट लांबीची ही बोट १८ फेब्रुवारी २0१७ रोजी ती नौदलाच्या ताफ्यात आली. लेफ्ट कमांडर वर्तिका जोशी यांनी या बोटीने सागर परिक्रमेत उत्तमरित्या साथ दिल्याबद्दल आभार मानले. जेमतेम १0 मिटर लांबीच्या या बोटीमध्ये सहाजणींचा १९४ दिवस वावर होता.
या जलप्रवासासाठी महिला अधिकाºयांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेले होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी ‘आयएनएसव्ही तारीणी’ आणि ‘आयएनएसव्ही म्हादई’ या बोटींवरुन २0 हजार सागरी मैलांचा प्रवास केलेला होता. यात मॉरिशस आणि गोवा ते केप टाउन जलप्रवासाचा यात समावेश होता. २0१६-२0१७ मध्ये या मोहिमा झालेल्या होत्या. ‘आयएनएसव्ही म्हादई’ बाबतचा उल्लेख लेफ्ट कमांडर वर्तिका यांनी आवर्जुन केला. कॅप्टन (निवृत्त) दिलीप दोंदे, कमांडर अभिलाष टॉमी यांच्या मार्गदर्शनाचाही वर्तिका यांनी उल्लेख केला.
आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंती केली. ही सागरी परिक्रमा यशस्वी ठरल्याने देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठला आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री भारावून गेल्या
विशेष म्हणजे निर्मला सीतारामन् यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्रात संरक्षणमंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर तीन दिवसातच त्या वेरे येथे पहिल्या जाहीर कार्यक्रमासाठी आल्या. नौदलाच्या या तळावरुनच त्यानी या बोटीला १0 सप्टेंबर रोजी बावटा दाखवून सागरी परिक्रमेचा शुभारंभ करुन दिला त्यानंतर आता या नौदल महिला अधिकारी परिक्रमा पूर्ण करुन गोव्यात परतल्या तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी सीतारामन् आवर्जुन उपस्थित राहिल्या. संरक्षण दलात महिलांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी जे काही शक्य आहे ते केले जाईल, असे त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते. महिला अधिकाºयांच्या या अजोड कामगिरीने त्या भारावून गेल्या आहेत. तसा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.
नौदलप्रमुखांचा नारी शक्तीला सलाम!
दरम्यान, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा म्हणाले की, नारी शक्तीला वाव देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या मोहिमेतून भारतीय महिलांचे कर्तृत्त्व जगाला दिसून आले आणि नारी शक्तीही कमी नाही, याची प्रचिती आली. महिलाही आव्हाने पेलू शकतात हे सिध्द झाले.