विमा कंपन्यांमोर मोठे ‘नैसर्गिक संकट’, द्यावे लागणार १४ हजार कोटी डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 08:18 IST2025-05-03T08:12:23+5:302025-05-03T08:18:22+5:30

मागच्या वर्षीच्या तुलनेत तोटा ६ टक्के वाढणार, अनेक योजना बंद करण्याची वेळ

Insurance companies face major natural disaster will have to pay $140 billion | विमा कंपन्यांमोर मोठे ‘नैसर्गिक संकट’, द्यावे लागणार १४ हजार कोटी डॉलर्स

विमा कंपन्यांमोर मोठे ‘नैसर्गिक संकट’, द्यावे लागणार १४ हजार कोटी डॉलर्स

नवी दिल्ली : जोरदार पाऊस, पूर, चक्रीवादळ आदी नैसर्गिक समस्यांमुळे २०२५ हे वर्ष विमा कंपन्यांशी डोकेदुखीचे ठरण्याची शक्यता आहे. प्रमुख जागतिक विमा कंपनी ‘स्विस रे’च्या ताज्या अहवालानुसार या वर्षात हवामान बदलाच्या प्रभावामुळे येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे विमा कंपन्यांना नुकसानभरपाईपोटी १४,५०० कोटी डॉलरची रक्कम द्यावी लागण्याची वेळ येऊ शकते. हा संभाव्य तोटा २०२४ मधील कंपन्यांच्या १३,७०० कोटी डॉलरच्या विमा नुकसानभरपाईच्या तुलनेत ६ टक्के अधिक आहे.

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा

नैसर्गिक आपत्तींची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांची वारंवारताही वाढल्याने विमा उद्योगापुढे एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांनी धोका वाढलेल्या भागात पॉलिसी देणे बंद केले आहे. 

एकूण तोट्यात दरवर्षी ५ ते ७ टक्के वाढ

‘स्विस रे’ने जारी केलेल्या अहवालानुसार मागील काही वर्षांचे आकडे पाहता आपत्तीमुळे होणारे विमा नुकसान दरवर्षी ५ ते ७ टक्क्यांनी वाढत आहे. हा केवळ विमा कंपन्यांसाठीच नव्हे, तर जागतिक अर्थव्यस्थेच्या स्थैर्याला एक मोठा इशारा आहे. अशीच स्थिती कायम राहिली, तर विमा कंपन्यांना १९९० नंतरचा दुसरा मोठा ताेटा २०२५ मध्ये होऊ शकतो.

धोका वाढल्याने पॉलिसी देण्यास टाळाटाळ

आता कंपन्या अत्यंत धोका असलेल्या परिसरात नवीन पॉलिसी देण्यास कचरू लागल्या आहेत. २०२४ मध्ये लॉस एंजलिसमध्ये जंगलाच्या आगीत २३,००० हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले होते. यात २९ जणांचा मृत्यू झाला, तर १६ हजारांपेक्षा अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती. यामुळे कॅलिफोर्नियामधील सुमारे डझनभर प्रमुख विमा कंपन्यांनी नवीन पॉलिसी देणे बंद केले आहे.

२०१७ मध्ये सर्वाधिक तोटा

२०१७ मध्ये आलेल्या ‘हार्वे’, ‘इरमा’ आणि ‘मारिया’ या वादळांनी विमा कंपन्यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका दिला. कंपनीच्या २०२५ मध्ये विमा दावे ३० हजार कोटी डॉलरच्या घरात जाऊ शकतात. ही शक्यता सुमारे १० टक्के आहे.

नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक स्तरावर २०२४ मध्ये विमा कंपन्यांना ३१,८०० कोटी डॉलर्सचा आर्थिक तोटा झाला. त्यापैकी केवळ ५७ टक्के, म्हणजेच १८,१०० कोटी डॉलर्सची भरपाई विमाद्वारे होऊ शकली.

२०२४ मध्ये आलेल्या ‘हेलेन’ आणि ‘मिल्टन’ या चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अमेरिकेतील भयंकर टॉर्नाडो, शहरांमधील पूर आणि कॅनडामधील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमा दावे, यामुळे हे वर्ष विमा इतिहासात विशेष बनले होते.

Web Title: Insurance companies face major natural disaster will have to pay $140 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.