सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 04:36 PM2024-03-08T16:36:33+5:302024-03-08T16:42:57+5:30

Sudha Murthy: सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Infosys founder Narayana Murthy's wife Sudha Murthy has been elected to the Rajya Sabha, her daughter Akshata Murthy is the wife of British Prime Minister Rishi sunak  | सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?

सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?

उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केल्याचा मला खूप आनंद आहे. समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका आहेत.

सर्वकाही असूनही त्यांचा साधेपणा अनेकांना भुरळ घालतो. मागील वर्षी सुधा मूर्ती यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्या जमिनीवर बसून मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना दिसतात. त्यांच्या साधेपणाची नेहमीच चर्चा रंगत असते. साधी साडी नेसून मातीच्या भांड्यात चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या सुधा मूर्ती आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. 

सुधा मूर्ती राज्यसभेवर 
सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी उत्तर कर्नाटकातील शिगाव येथे झाला. सुधा मूर्ती यांनी बीव्हीबी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. खरं तर १५० विद्यार्थ्यांमध्ये इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एक भारतीय फॅशन डिझायनर आहेत. याशिवाय अक्षता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत.

दरम्यान, सुधा मूर्ती यांनी एकदा त्यांच्या मुलाशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीवर ५० हजार रुपये खर्च करण्याऐवजी एक छोटीशी पार्टी करून उरलेले पैसे ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्यावेत, असे त्यांनी मुलाला सांगितले होते. सुधा मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांच्या मुलाने यासाठी नकार दिला, पण तीन दिवसांनी त्याने ते मान्य केले. काही वर्षांनंतर त्यांचा मुलगा स्वतः शिष्यवृत्ती घेऊन आला आणि म्हणाला की, हा पैसा २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वापरावा. एकूणच मुलांना पैशांचा योग्य वापर आणि दयाळूपणा शिकवणे हे गरजेचे असल्याचे सुधा मूर्ती सांगतात. 

Web Title: Infosys founder Narayana Murthy's wife Sudha Murthy has been elected to the Rajya Sabha, her daughter Akshata Murthy is the wife of British Prime Minister Rishi sunak 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.