लष्कराच्या हालचालींवर नजर, पाकिस्तानसाठी हेरगिरी, अरुणाचल प्रदेशमधून २ काश्मिरी तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:47 IST2025-12-11T14:47:25+5:302025-12-11T14:47:55+5:30
Arunachal Pradesh News:अरुणाचल प्रदेश पोलिसांनी मोठं यश मिळवताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नाजिर अहमद मलिक आणि सबीर अहमद मीर या दोन तरुणांना हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे.

लष्कराच्या हालचालींवर नजर, पाकिस्तानसाठी हेरगिरी, अरुणाचल प्रदेशमधून २ काश्मिरी तरुण अटकेत
देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित गोपनीय माहितीला सुरुंग लावण्याचा मोठा प्रयत्न सुरक्षा दलांना हाणून पाडला आहे. अरुणाचल प्रदेश पोलिसांनी याबाबतीत मोठं यश मिळवताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नाजिर अहमद मलिक आणि सबीर अहमद मीर या दोन तरुणांना हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही तरुण भारतीय लष्कराची तैनाती, त्याची ठिकाणे आणि हालचालींसंदर्भात संवेदनशील आणि गोपनीय माहिती गोळा करत होते. तसेच ही माहिती पाकिस्तानस्थित हँडलर्सना पुरवत होते.
सुरक्षा यंत्रणांनी सहजासहजा ट्रेस करू नये यासाठी हे संपूर्ण नेटवर्क नेटिग्राम चॅनेलच्या माध्यमातून चालवलं जात होतं. दोन्ही आरोपींकडील फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासामधून त्यांनी लष्कराशी संबंधित हालचाली आणि ठिकाणांची माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पाठवली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. ही माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानली जात आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींकडील उपकरणांच्या तपासणीमधून अल अक्सा नावाच्या एका टेलिग्राम चॅनेलचं कनेक्शन सापडलं आहे. त्यामुळे हे एक संघटित हेरगिरी मॉडेल असल्याचे आणि त्यामाध्यमातून नियोजनबद्धरीत्या भारताच्या लष्करी हालचालींची माहिती गोळा केली जात होती, हा संशय अधिकच गडद झाला आहे. या दोन्ही तरुणांना पाकिस्तानमधून सूचना मिळत होती आणि त्याआधारावर ते परिसरात फिरून माहिती गोळा करत होते, असे प्राथमिक तपासामधून स्पष्ट झाले आहे.