घुसखोरी हे बंगालसमोरील सर्वांत मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 08:55 IST2026-01-18T08:54:40+5:302026-01-18T08:55:12+5:30
बिघडलेल्या परिस्थितीस तृणमूल काँग्रेसच जबाबदार

घुसखोरी हे बंगालसमोरील सर्वांत मोठे आव्हान : पंतप्रधान मोदी
मालदा : पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर स्थलांतरामुळे त्या राज्याच्या लोकसंख्येचे स्वरूप बदलले, दंगली उसळल्या. हे सर्व प्रकार तेथील सत्ताधारी पक्षाने या लोकांना दिलेला आश्रय व सिंडिकेट राजमुळे घडले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर केली.
मतदारयाद्यांच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेवर सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, बांगलादेशात धार्मिक छळाला सामोरे जाऊन भारतात स्थलांतरित झालेल्या मतुआ समाजासारख्या निर्वासितांना घाबरण्याचे कारण नाही. पुढे ते म्हणाले, घुसखोरी हे पश्चिम बंगालसमोरील मोठे आव्हान आहे. तृणमूल काँग्रेसची सिंडिकेट व्यवस्था घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये स्थायिक करण्यासाठी काम करतेय. येथे भाजपचे सरकार स्थापन होताच घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल." दरम्यान, मोदी यांनी मालदा टाऊन रेल्वे स्थानकातून हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
३२५० कोटींच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन
पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी ३,२५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.
मालदा येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी न्यू जलपायगुडी ते नागरकोईल आणि तिरुचिरापल्ली तसेच अलीपुरद्वार ते एसएमव्हीटी बेंगळुरू आणि पनवेल यांना जोडणाऱ्या चार अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांना आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधानांनी पहिल्या चंदे भारत स्लीपर गाडीमध्ये आमंत्रित केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते मुलांबरोबर बसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच प्रश्नांची उत्तरेही दिली.