Indiraji's PM's headline again; 54-year-old Indian newspapers in the melting glacier | इंदिराजींच्या पंतप्रधानपदाचा मथळा पुन्हा; वितळत्या हिमनदीत ५४ वर्षे जुनी भारतीय वृत्तपत्रे

इंदिराजींच्या पंतप्रधानपदाचा मथळा पुन्हा; वितळत्या हिमनदीत ५४ वर्षे जुनी भारतीय वृत्तपत्रे

पॅरिस : स्वर्गीय इंदिरा गांधी सन १९६६ मध्ये पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा भारतातील दोन प्रमुख वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेले मथळे इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये झळकले असून, तेथील लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरले आहेत.

आल्प्स पर्वतराजींच्या फ्रान्समधील भागात असलेली ‘मॉन्ट ब्लांक’ ही हिमनदी सध्या वितळू लागली असून, त्या वितळत्या बर्फात ‘नॅशनल हेरॉल्ड’व ‘द हिंदू’ आणि ‘स्टेट्समन’ इत्यादी २ भारतीय दैनिकांचे २४ जानेवारी १९६६ या दिवशीचे काही अंक सापडले आहेत. आश्चर्य म्हणजे गेली ५४ वर्षे बर्फाखाली गाडलेले राहूनही छापलेला मजकूर स्पष्टपणे वाचता येईल एवढे हे कागदी वृत्तपत्रांचे अंक सुखरूप राहिले आहेत. या दोन्ही वृत्तपत्रांचा त्या दिवशीच्या अंकांचा मुख्य मथळा इंदिरा गांधी यांची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याचा होता.

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे निधन झाल्यानंतर गुलजारीलाल नंदा १३ दिवसांसाठी दुसऱ्यांदा हंगामी पंतप्रधान झाले. २३ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांची काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदासाठी निवड केली व त्याच्या दुसºया दिवशी त्यांचा शपथविधी झाला होता. वितळत्या हिमनदीत सापडलेल्या वृत्तपत्रांमधील मथळे इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला त्यादिवशीच्या अंकातील आहेत.

इंदिरा गांधींचा ज्यादिवशी शपथविधी झाला त्याचदिवशी एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ नावाचे बोर्इंग ७०७ प्रवासी विमान फ्रान्समधील आल्प्स पर्वतराजींमध्ये कोसळून विमानातील सर्व १७७ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. ते विमान आल्प्स पर्वतांतील ‘बोसॉन्स’ या दुसºया एका हिमनदीच्या परिसरात कोसळले होते. वरील दोन भारतीय वृत्तपत्रांचे जुने अंक जेथे सापडले ते ठिकाण ‘कांचनगंगा’ विमान अपघाताच्या ठिकाणापासून पायी ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.हॉटेलवाल्यास सापडले अंक
५४ वर्षांपूर्वीच्या वृत्तपत्रांचे हे अंक तिमोथी मॉत्तिन या हॉटेलमालकास गेल्या आठवड्यात सापडले.
४,४५५ फूट उंचीवर उपहारगृह अथवा हॉटेल आहे. त्यांचे नाव ‘ला काबान द््यु सेºहो’ (स्पॅनिश भाषेत ‘पर्वतावरील घर’) असे आहे.
तेथून जवळच बर्फावर खेळल्या जाणाºया ‘स्किर्इंग’ या धाडसी खेळाचे लोकप्रिय केंद्र आहे. सध्या त्यांनी ती वृत्तपत्रे वाळत ठेवली आहेत.

दोन विमान अपघातांचे रहस्य
फ्रेंच आल्प्स पर्वताच्या याच भागात दोन भारतीय प्रवासी विमाने कोसळली व त्या दोन्ही अपघातांचे सहस्य अद्यापही पूर्णपणे उलगडलेले नाही.

१९६६ मधील ‘कांचनगंगा’ दुर्घटनेच्या आधी सन १९५० मध्ये एअर इंडियाचे ‘मलबार प्रिन्सेस’ हे विमान याच भागात कोसळले होते. दोन्ही अपघातग्रस्त विमानांचे मोठे अवशेष अजूनही सापडलेले नाहीत.
२०१७ मध्ये या परिसरात काही मानवी मृतदेहांचे अवशेष सापडले होते. ते कदाचित या दोन अपघातग्रस्त विमानांतील प्रवाशांचे असावेत, असे मानले जाते.

बर्फ पूर्ण वितळून खळाळत्या ओढ्याच्या रूपाने वाहू लागले असते, तर हे वृत्तपत्राचे एवढे नाजूक व जुने अंक नष्ट झाले असते; परंतु तसे होण्याच्या आधीच ते सापडले हे मी माझे भाग्य समजतो. दुर्मिळ वस्तू म्हणून विकून बख्खळ पैसा कमावण्याऐवजी मी हे अंक माझ्या हॉटेलमध्ये प्रदर्शनात मांडून लोकांना त्याचा आनंद घेऊ देईन.
-तिमोथी मत्तिन, हॉटेलमालक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indiraji's PM's headline again; 54-year-old Indian newspapers in the melting glacier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.